| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे.
जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२ नोव्हेंबरपासून राज्यभर पेन्शन संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मेटाकुटीला आलेल्या सरकारची डोकेदुखी या नव्या आंदोलनाने आणखी वाढणार आहे.
जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचे संयोजक वितेश खांडेकर यांनी सांगितले की, नव्या पेन्शन योजनेला असलेला विरोध आणि जुन्या पेन्शन योजनेची गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी २२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात राज्यातील मुंबई ते वर्धा अशा सर्व ३६ जिल्ह्यांत पेन्शन संघर्ष यात्रा काढली जाईल. आझाद मैदान येथून जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीमधील सर्व संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन देऊन पेन्शन संघर्ष यात्रेची सुरुवात करतील. पेन्शन संघर्ष यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जनजागृती केल्यानंतर ७ डिसेंबरला वर्ध्यातील सेवाग्राम येथे समारोप होईल, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत पोहचून या बाबत अधिकची जागृती आम्ही करणार आहोत, असे संघटनेचे महासचिव गोविंद उगले यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना या आंदोलनाचे संयोजक आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, चतुर्थश्रेणी अशा सर्व प्रकारातील संघटनांनी संघर्ष समन्वय समितीमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे ही संघर्ष यात्रा अधिकारी – कर्मचारी संघटनेसाठी एक नवा अध्याय असेल.
संघर्ष यात्रेनंतर विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून त्याचेही सूक्ष्म नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी यांनी सांगितले. तरी सर्वांनी आपल्या जिल्ह्यासह संघर्ष यात्रेनंतर होणाऱ्या पेन्शन मार्च साठी जल्लोषात सहभागी होण्याचे आवाहन कोषाध्यक्ष प्रविण बडे, सल्लागार सुनिल दुधे, मनीषा मडावी यांच्यासह सर्व विश्वस्त, राज्य पदाधिकारी यांनी केले आहे.
असा असेल नियोजित मार्ग :
प्रत्येक जिल्ह्यात सभा, बैठका, मेळावे होणार असून त्या नंतर जर अधिवेशन पुढे गेले तर अधिवेशन पूर्वी वर्धा नागपूर किंवा कल्याण मुंबई असा पेन्शन मार्च होईल, अशीही माहिती दिली जात आहे. (खालील छायाचित्रे त्याबाबत माहिती देतील.)
https://twitter.com/iamprajakt/status/1460580146725801987?t=RTm-XMZ0EXwohaRM6UYkJQ&s=19
या संघटना आहेत सहभागी :
महाराष्ट्रातील जवळपास ६० संघटना या संघर्ष यात्रेत सहभागी आहेत. या मध्ये राजपत्रित अधिकारी महासंघ, मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, सर्व शिक्षक संघटना, आरोग्य संघटना, प्राध्यापक – वन – लेखा कोषागार, ग्रामसेवक, ITI आदी यांसह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.