जयंत पाटलांनी टप्प्यात येताच भाजपचा केला कार्यक्रम, सांगली मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा

| सांगली | सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे. भाजपचे सात सदस्य फुटले. त्यापैकी पाच जणांचे राष्ट्रवादीला मतदान तर दोघे गैरहजर राहिले.

दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते पडली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काम पाहिले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आम्हाला जनतेने दिलेल्या सत्तेत स्वारस्य नाही असे सांगत प्रारंभी जयंत पाटील यांनी भाजपला गाफील ठेवत “करेक्‍ट’ कार्यक्रम केला.

टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करतोच असे सांगत जयंत पाटील यांनी बार टाकत भाजपला
नेस्तनाबूत केले. भाजपची पुर्ण बहुमताने आलेली सत्ता प्रथमच उलथली.

ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य :

कोल्हापुरातून तर भाजपच्या सदस्यांनी खरे क्‍लब हाऊसमधून मतदान केले. साडे अकरावाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात झाली होती. त्यानंतर पंधरा मिनिटे अर्ज माघारीसाठी होते. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाईन मतदान झाले. गेले चार दिवस भाजपचे सदस्य नॉटरिचेबल होते. त्यामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम साशंक होतेच. महापौर पदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा याबाबतचा सस्पेन्सही आज कायम होता.

सकाळी कॉंग्रेसच्या उत्तम साखळकर व राष्ट्रवादीच्या मैन्नुदीन बागवान यांनी माघार घेत दिग्विजय यांचा मार्ग मोकळा केला. भाजपकडे 42 जणांचे बहुमत होते. मात्र त्यांची सकाळपर्यंतची जुळणी 36 जणांपर्यंतच झाली होती. दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदुम होते. अन्य सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी कॉंग्रेस आघाडीला मतदान केले. त्यांच्याशिवाय नसीम नाईक, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, महेंद्र सावंत यांनी मतदान केले. त्यामुळे भाजपच्या चारमतांसह त्यांची हक्काची एकूण सात मते फुटली आणि भाजपचे संख्याबळ 36 वर घसरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *