पाकिस्तानात घुमणार ‘ जय भवानी, जय शिवाजी ‘ हा नारा, शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उदयनराजे भोसले राहणार उपस्थित..!

| कराची | अखंड भारताचा अभिमान आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ देशच नव्हे, तर जगभर दरवर्षी जल्लोषात साजरी केली जाते. यंदा हा उत्साह पाकिस्तानमध्येही पाहावयास मिळेल. कराचीत स्थायिक असलेल्या गायकवाड, भोसले, दुपटे, राजपूत, जगताप, अटकेकर अशा मराठी बांधवांना शिवरायांची महती ऑनलाइन ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सातारा येथील दिलीप पुराणिक (६५) यांच्या वतीने हा ऑनलाइन व्याख्यान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुस्लिम विचारवंत व महाराष्ट्र दंगलमुक्त अभियानचे अध्यक्ष शेख सुभान अली शिवरायांचा इतिहास सांगणार आहेत. शिवजयंती १९ फेब्रुवारीला असली तरी पाकिस्तानमध्ये हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी २१ रोजी परवानगी देण्यात आली आहे.

कराचीतील मराठी कुटुुंबातील जवळपास १०० जण यात सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानातून शिवरायांवरील इतिहास ऐकण्यासाठी तेथील मराठी बांधव प्रचंड उत्सुक असल्याचे दिलीप पुराणिक यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे एका ठरावीक धर्माचे नव्हते, तर रयतेचे राज्य होते. त्यांनी जाती, धर्म यावरून जनतेमध्ये कधीही भेद केला नाही. त्यांच्या राज्यकारभारातील हीच बाब या उपक्रमातून मांडण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हा आगळावेगळा उपक्रम राबवण्याबाबत विचार कसा समोर आला याबद्दल बोलताना पुराणिक म्हणाले, ‘कराचीतील मराठी बांधवांना दर रविवारी मी झूम मीटिंगद्वारे मराठी शिकवत असतो. तेव्हा मराठी संस्कृती, येथील लोक आणि महापुरुष यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आकर्षण असल्याचे जाणवले. महाराष्ट्रात प्रत्येक सण कसा साजरा होतो याबद्दल तेथील बरेच जण कुतूहलाने विचारत असतात.

कराचीत खासगी नोकरीत असणाऱ्या विशाल राजपूतने एके दिवशी शिवाजी महाराजांबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. शिवकालीन इतिहास अधिक जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असल्याचे या संपर्कातून जाणवले. तेव्हाच मग ऑनलाइन शिवजयंती साजरी करण्याचा विचार पुढे आला. त्या अनुषंगाने २१ फेब्रुवारी रोजी हे ऑनलाइन व्याख्यान घेण्यात येणार आहे. या वेळी व्याख्याते शेख सुभान अली हे शिवकालीन इतिहासातील अनेक गोष्टींवर विचार मांडतील. गुगल मीटवर हा कार्यक्रम होणार असून सध्याच्या स्थितीत तेथील १०० जणांनी कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत सहमती दर्शवली आहे. एक अॉनलाइन कार्यक्रम घेऊन थांबवणार नसून यापुढे जाऊन शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंबद्दल इतिहासातील छोट्या छोट्या कहाण्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तेथील मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यात येतील, अशा प्रकारचे नियोजन केले जात असल्याचे पुराणिक यांनी सांगितले.

फुले, शाहू, आंबेडकर आदी महापुरुषांवरही व्याख्यान
पाकिस्तानात स्थायिक असलेल्या मराठी बांधवांना भारतातील संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण आहे. नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. छत्रपती शिवरायांनंतर आता शाहू, फुले, आंबेडकर आदी महापुरुषांचीही ऑनलाइन व्याख्याने आम्ही घेणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *