आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ…..

सांगली : काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक-एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.




दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 

 

खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. सांगली लोकसभा मतदासंघाबाबत काँगेसच्या वरिष्ठांकडून अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही, त्यामुळे संजय राऊत यांच्या भेटीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत.



लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघात अद्याप काँग्रेस आणि शिवसेनेच्या जागा वाटपाचा घोळ सुटलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रावर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

 

 

मात्र, काँग्रेस पक्ष युवा नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. वेळ पडली तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी सुद्धा काँग्रेस तयार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि युवा नेते विशाल पाटील यांच्या सहित स्थानिक काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असले तरी सुद्धा काँग्रेस हाय कमांडकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.


 

मुंबई मधून हेलिकॉप्टरने कवलापूर या ठिकाणी आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत बातचीत केली. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या विषयी आपल्याला आदर आहे, त्यांना शिवसेना न्याय देणार असून विशाल पाटील यांना शिवसेनेमार्फत संसदेत पाठवून न्याय दिला जाईल, असं खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *