| नवी दिल्ली | देशात कोरोना संकट काळात बँकिंग फसवणूकीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. यामागील एक मुख्य कारण म्हणजे, या काळात इंटरनेटचा वाढता वापर. एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. याबाबत गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे. सायबर दोस्त नावाच्या सरकारच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून लोकांना या नव्या पद्धतीने सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, गृह मंत्रालय याविषयी सतत सतर्क राहते. हे सायबर गुन्हेगार केवायसीची बतावणी करून लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवित आहेत, असे ट्विट करुन गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ग्राहक केवायसी / रिमोट अॅक्सेस अॅप फसवणूकीपासून सावध रहा. सध्या फसवणूक करणारे लोक कॉल किंवा एसएमएस करुन लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत.
अशाप्रकारे, लोकांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील मिळवून ते गुन्हेगारी कारवाया करीत आहेत. मंत्रालयाने लोकांना अशी कोणतीही चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, तुमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही कॉल, मेसेज किंवा ई-मेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असेही म्हटले आहे.
केवायसीसाठी कॉल किंवा एसएमएस आल्यास सतर्क व्हा!
जर आपल्याला केवायसीसाठी कोणताही कॉल किंवा एसएमएस मिळाल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. केवायसी नसल्यामुळे आपले बँक खाते बंद होईल असे सांगत कोणताही एसएमएस आला तर अशा परिस्थितीत, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याबद्दल जाणून घ्या. याशिवाय, फोनवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नका.
या व्यतिरिक्त आपल्या फोनवर Anydesk किंवा TeamViewer सारखे कोणतेही अॅप डाउनलोड करणे टाळा. आपण अशा अॅपसह आपल्या डिव्हाइसवर रिमोट अॅक्सेस देत असल्यास, फसवणूक करणार्यांना आपला पिन, ओटीपी, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही आर्थिक फसवणूकीचा बळी ठरू शकता.
बनावट मेसेज कसे टाळावे?
बनावट मेसेजबाबत सतर्कता सरकार वेळोवेळी जारी केली जाते. यासह, तुम्ही अज्ञात नंबरवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि अशा मेसेजना फॉरवर्ड करणे टाळावे. जेणेकरून दुसरा कोणताही युजर्स फसवणूकीचा बळी पडू नये.