अकोला लोकसभेसाठी प्रहार पक्षाचा पाठिंबा कुणाला ? बच्चू कडू बैठकीत घेणार निर्णय

अकोला : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात महायुतीतील घटक पक्ष ‘प्रहार पक्ष’ वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे.

 

 

महायुती आणि महाविकास आघाड्यांकडून प्रचारास जोमाने सुरुवात झाली आहे. प्रहारने अमरावती लोकसभा मतदारसंघात आपली वेगळी भूमिका घेतली आहे. आता प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यातही आपली भूमिका जाहीर करणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे संस्थापक बच्चू कडू उद्या अकोल्यात दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

उद्या ७ एप्रिलला ११ वाजता प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात हॉटेल सेंटर प्लाझा येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाठिंब्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे प्रहार पक्ष अकोला लोकसभा मतदारसंघात कोणाला पाठिंबा देणार तसेच काही वेगळी भूमिका घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महायुतीने अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.

 

आमदार बच्चू कडूंनी खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या आधीचं जाहीर केली असून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. दरम्यान महायुतीत राहून केवळ अमरावतीपुरतीच मैत्रीपूर्ण लढत राणा यांना धडा शिकविण्‍यासाठी आहे की महाविकास आघाडीला नुकसान पोहचिविण्‍यासाठी आहे असा प्रश्‍न अमरावतीत उपस्थित होत आहे. त्यामुळे अकोल्यात प्रहार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

मागील काही काळ बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहे. यादरम्यान त्यांचे अकोला जिल्ह्यात अनेकांशी जवळीक संबंध आहे. बच्चू कडूंना मानणारा एक मोठा वर्ग अकोल्यात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातल्या अकोट विधानसभा मतदारसंघात प्रहारकडून २०१९ च्या निवडणुकीत तुषार पुंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

 

 

तेव्हा २३ हजार ९३४ मते प्रहारला मिळाली होती. या शिवाय प्रहारने जिल्हा परिषदेतही खाते उघडले होते. त्यामुळे प्रहार पक्षाचा पाठिंबा नेमका कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


दरम्यान अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि महायुतीकडून भाजपाचे अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आता प्रहारचे बच्चू कडू उद्या कोणाला पाठिंबा जाहीर करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *