| माणगाव/ रायगड | रायगड जिल्ह्यातील शिक्षकांची कामधेनू असलेल्या पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक होऊ घातली असल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. पेण पतपेढीच्या विद्यमान सत्ताधारी पॅनलने आयोजित केलेला सभासद मेळावा काल २६ एप्रिल रोजी कुणबी समाज भवन, माणगाव येथे उत्साहात आणि सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या श्री बाबुराव पालकर गुरुजी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व संघटनाना सामावून घेत एक सर्वसमावेशक व संतुलित पॅनल घेऊन सभासदांच्या समोर जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ (दोंदे गट) कर्जत शाखा, पनवेल शाखा व सुधागड शाखा यांनी सत्ताधारी पॅनलला जाहीर केलेला पाठींबा हे या मेळाव्यातील मुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विविध संघटनांच्या सोबतच नवीन DCPS योजना धारक तरुण शिक्षकांचे संघटन म्हणून नावास आलेली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन ने देखील सत्ताधारी पॅनल ला पाठींबा जाहीर केला असल्याने चुरस वाढली आहे. लवकरच सर्व पॅनल आपापला जाहीरनामा घेऊन सभासदांच्या समोर येतील तेंव्हा निवडणूक खरी रंगात येईल अशी चर्चा उपस्थित सभासदांच्या मध्ये होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग चे रायगड जिल्हा कार्यवाहक श्री विजय पवार यांनी सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन केले. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. सदर मेळाव्यास बाबुराव पालकर गुरुजी,राजेश सुर्वे, संजय निजापकर, मारूती कळंबे, सुर्यकांत करंजीकर, राजेश जाधव, सुभाष भोपी, वैभव कांबळे, जयदास घरत, मनोहर काप, विवेकानंद थळे, विजय पवार, नितिन गर्जे, मंदार रसाळ, नरेश मोकाशी, कमलाकर शिंदे, विजय जगताप, अनिल नागोठकर, सुहास चांदोरकर
आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.