धाराशिव :ज्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला, त्यांचा प्रचार आम्ही करायचा का? आम्ही ते कदापी करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आमचा विरोध असून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. पाहिजे तर आमचे राजीनामे घ्या, असे म्हणत हजारो कार्यकर्ते काल रात्री सोनारी येथील कारखान्यावर गोळा झाले होते.
त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून दिले. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीचे पडसाद काल भूम परंडा वासी या मतदारसंघांमध्ये उमटले असून हजारो कार्यकर्ते अर्चना पाटील यांच्या विरोधात उभे आहेत.
महायुतीमध्ये विरजण पडण्याची शक्यता असून तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे अपक्ष उमेदवारी दाखल करू शकतात अशी शक्यता आहे. अर्चना पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून घोषणा होताच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल केल्या.
त्या पोस्टमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो दिसून आल्यामुळे सावंत समर्थक कार्यकर्ते अधिकच चिडलेले पाहायला मिळाले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या रसिकेच लढाईमध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून तानाजी सावंत यांना मात दिली आहे. त्यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने जागा खेचून घेतली आहे.
मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नसताना देखील आयात उमेदवाराला त्यांनी संधी दिली आहे. अर्चना पाटील यांचे नाव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर होताच जिल्ह्यामध्ये याचे तीव्र प्रसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सावंत समर्थक आणि काल रात्री आठच्या सुमारास कारखान्यावर एकत्र येतात घोषणाबाजी करून परिसर धणाणून सोडला.
यावेळी किमान हजार ते दीड हजार कार्यकर्ते एकत्र आले होते. धनंजय सावंत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. धनंजय सावंत आपण अपक्ष उमेदवारी भरा आम्ही आपणास निवडून देऊ, या घोषणा कार्यकर्त्याकडून देण्यात आल्या.
ज्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला त्यांचा प्रचार आणि कधीही करणार नाही, पाहिजे तर आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देतो. पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणारच नाही, असं ठासून कार्यकर्ते सांगत आहेत.