बहुजनांच्या स्फूर्तिस्थळांची परिक्रमा; तसेच ३१ ऑगस्ट रोजी बहुजनांची परिषद होणार- अरुण खरमाटे

| सांगली | ओबीसी व भटक्या-विमुक्त जातीजमाती संघटनेतर्फे बहुजनांच्या स्फूर्तिस्थळांची परिक्रमा आयोजित केली आहे. ओबीसी नेते मंत्री विजय वडेट्टीवार व भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ती निघेल. सोलापुरातील रामवाडी येथे सेंटलमेंट छावणी होती. त्या ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अरुण खरमाटे यांनी आज दिली.

ब्रिटिशांनी ऑगस्ट १८७१ मध्ये भटक्या-विमुक्तांसाठी सेंटलमेंट छावण्या सुरू केल्या. त्याला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिक्रमा आयोजित केली आहे. राज्यात सात ठिकाणी छावण्या होत्या. १९८ जाती-जमातींमधील भटक्यांना तेथे बंदिस्त केले होते.

स्वातंत्र्यानंतर त्यांची मुक्तता झाली. सोलापुरात रामवाडी येथेही अशीच छावणी होती. त्या ठिकाणी परिषद होत आहे. त्यासाठी वडेट्टीवार, गायकवाड यांच्यासह १९८ जाती-जमातींचे प्रतिनिधी येणार आहेत. वर्षभर चालणाऱ्या परिक्रमेचे स्वरूप, मार्ग, प्रारंभ, सांगता आदी रुपरेखा याचवेळी वडेट्टीवार जाहीर करतील.

खरमाटे म्हणाले, ”परिक्रमेंतर्गत चौंडी, पाली, ज्योतिबा, पुरंदर, बाणुरगड, माहुर, भगवानगड, मढी, सिंदूर, पोहरादेवी अशी भटक्या विमुक्तांची श्रद्धास्थाने व स्फूर्तिस्थळे असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या जातील. येथील पराक्रमाचा इतिहास जागवला जाईल. समाजासाठी हा जागर असेल. परिषदेमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना, १०२ वी घटना दुरुस्ती, ओबीसींचे राजकीय आरक्षण, ७२ वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्न आदि विषयांवरही विचारमंथन होईल. सुनील गुरव, अर्चना सुतार, अजित भांबुरे, संजय विभूते, नंदकुमार नीळकंठ, दीपक सुतार, बाळासाहेब गुरव, चंद्रकांत मालवणकर, रंजना माळी, नीलेश भांबुरे, वसुधा कुंभार, बाळासाहेब कुंभार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *