सावधान!… गुप्तहेर गूगल तुमचा पाठलाग करत आहे…

तुम्ही एखादा नवीन काँटॅक्ट तुमच्या फोनबूकमध्ये सेव्ह केलात, की त्या व्यक्तीचे फेसबूक प्रोफाईल, ‘पीपल यू मे नो’ मध्ये दिसते, हे सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याच्याही पलिकडे जाऊन आपले सर्व ऑफलाईन बोलणे आणि हालचालीसुद्धा ट्रॅक होत असतात…

गेल्या काही दिवसांत मला आलेले काही अनुभव:

१) एका मैत्रिणीबरोबर गप्पा मारत असताना, तिने तिच्या बहिणीसंदर्भात काही माहिती सांगितली. त्या बहिणीला मी कित्येक वर्षांत भेटलो नव्हतो किंवा तिचा नंबरसुद्धा माझ्याकडे नाही / नव्हता. तरीसुद्धा त्या मैत्रिणीच्या बहिणीचे प्रोफाईल मला दुसर्‍या दिवशी ‘पीपल यू मे नो’ ह्या सदरात दिसले…

तुम्ही काय बोलताय, ते नुसते ट्रॅक होत नाहीये, तर त्याचे अॅनालिसिस होऊन, त्या मैत्रिणीने तिच्या बहिणीचे फक्त पहिले नाव घेऊनही, गूगलने तिला शोधून तिचे प्रोफाईल मला दाखवले…

२) परवा एका मित्राच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेलेलो असताना, तिथे एका मित्राने, त्याच्या अजून एका मित्राची ओळख करून दिली. हाय-हॅलो करून दोन मिनिटं बोललो, एवढीच माझी इंटरॅक्शन झाली… त्या व्यक्तीचे प्रोफाईल मला फेसबुकाने दुसर्‍या दिवशी ‘पीपल यू मे नो’ मध्ये दाखवले…

इथेही, कॉमन मित्राच्या फोनबुकात असलेले आम्ही दोघे, एका लोकेशनवर होतो, हे गूगलने ट्रॅक केले, आणि तुम्ही काल भेटला होतात, म्हणजे तुम्ही ह्यांना ओळखत असाल, हे दाखवून दिले…

म्हणजेच, तुमचे बोलणे, तुमचे ठिकाण, तुमचे फोनबूक, वगैरे सर्व अत्यंत बारकाईने ट्रॅक होतंय, तुमच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवली जात्येय… तुमचा माग ठेवला जातोय, त्यामुळे तुम्ही हरवणार नाही. हा फायदा सोडला, तर तुमचे कुठलेच व्यवहार वैयक्तिक किंवा कॉन्फिडेन्शिअल नाहीत, हे सिद्ध होत्येय…

मग ह्यावर उपाय काय? तर उपाय एकच… जेव्हा नको असेल, तेव्हा तुमचे लोकेशन ऑफ ठेवा, तुमच्या फोनचा माईक बंद करा आणि फक्त जेव्हा गरज असेल, तेव्हाच फोनचे डेटा कम्युनिकेशन चालू ठेवा… अर्थात, त्यामुळे तुमचा माग काढणे संपूर्णपणे बंद झाले नाही, तरी खूप प्रमाणात कमी तरी नक्की होईल.

तळटीपा:
१. जरी मी वरची दोन्ही उदाहरणे फेसबुकावरची दिली असली, तरी तुमचा फोन (मर्यादित संख्या असलेल्या अॅपलचा अपवाद वगळता) हा अँड्रॉइड सिस्टिमवर चालतो आहे, जी गूगलने बनवलेली आहे, आणि अँड्रॉइडवर चालणारी सगळी अॅप्ससुद्धा गूगल प्ले-स्टोअरवरून आलेली असतात. त्यामुळे अंतिमतः सर्व कंट्रोल्स गूगलच्याच हातात आहेत…
२. तुम्ही पूर्ण काळजी घेऊनही, तुम्ही गूगलला तुमच्या आयुष्यात डोकावण्यापासून थांबवू शकाल, ह्याची खात्री नाहीच..
३. गूगल त्यांच्या सर्व सेवा तुम्हाला फुकट का देते, हे आले लक्षात?! नथिंग कम्स फ्री 

–शरद केळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *