‘भाजपाच जिंकणार आहे, पण…’, शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख

शशांक केतकर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळा अभिनेता शशांक केतकरनं बॉलिवूडमध्ये ही त्याची छाप सोडली आहे. शशांकची ‘मुरांबा’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील त्याची अक्षय मुकादम ही भूमिका प्रेक्षकांना आवडते. तर शशांक सध्या त्याच्या आगामी ‘तेलगी स्कॅम 2003’ आणि ‘शोटाइम’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सगळ्यात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शशांकनं सध्याच्या सुरु असलेल्या राजकारणावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

शशांकनं ‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राजकारणावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शशांकला प्रश्न विचारण्यात आला की “तुझं राजकारणाकडे लक्ष असतं का?” यावर उत्तर देत शशांक म्हणाला, “माझं 100 टक्के लक्ष असतं. मी एक कलाकार असण्याआधी एक माणूस त्यामुळे हे सहज होतं. कारण त्यामुळेच मला माझ्या आजुबाजूला असलेल्या समस्या दिसतात.

त्याचं कारण म्हणजे जर मी कलाकार म्हणून हवेत राहून बोललो असतो की मला कोणतीही समस्या नाही, तर मग हे मी माझ्याशीस खोटं बोललो असतो. मी माणूस आहे, त्यामुळे आजूबाजूला फिरताना, भाजी विकत घेताना, बाहेर रांगेमध्ये उभं राहताना, टोल भरताना, रस्त्यावर गाडी चालवताना, चालताना, शूट करताना, आजूबाजूच्या अनेक समस्या दिसतात. इतकंच नाहीतर त्यासोबत देशात होणारा विकास सुद्धा दिसतो.

त्यामुळे मी आंधळेपणानं कोणाचं कौतुक करत नाही. जे चांगलं काम करतात त्याचं मी अगदी तोंडभरून कौतुक करतो. कारण इतकी प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये, त्या देशाचा वेग न थांबवता सगळा विकास करायचा आहे. ही सगळ्यात मोठी आणि अवघड अशी गोष्ट आहे. जी काम सुरू आहेत ती छान पद्धतीने सुरू आहेत. अशावेळी इतर काम करणं देखील गरजेचं आहे आणि जिथे जिथे काम रखडली आहेत. त्यावर सुद्धा मी आवर्जुन बोलतो.”

पुढे शशांकला विचारलं की, “लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय पक्षाची झुंज चालू आहे. आरोप-प्रत्यारोप करतायत. आधी एकत्र होते, आता तेच भांडतं आहे, याचा त्रास होतो का?” यावर शशांक म्हणाला की “या सगळ्याचा त्रास होतो, पण हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधी अनेकदा घडलंय.

परवाच मी एक गोष्ट ऐकत होतो की अमित शाहांचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? त्याने कुठे क्रिकेट खेळलंय? वगैरे…मग माननीय शरदचंद्र पवारजी सुद्धा आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यांनी सुद्धा कुठे क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे त्याच्यातलं नॉलेज आणि त्यासाठी लागणारा जो बिझनेस माणूस आणू शकतो अशा योग्य माणसाला त्या पदी बसवलं जातं. हे आपल्याकडे अनेकदा घडलं आहे.”

स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं राजकारण

शशांक म्हणाला हे जे राजकारण आहे ते खूप स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं सुरू आहे. एखाद्याचा संपूर्ण एक संच हा आपल्याकडे वळवणं म्हणजे इकडंचं तिकडे तिकडंचं इकडे हे एक वेगळ्याच पातळीचं राजकारण सुरू आहे. या सगळ्यात आपण न पडलेलंच बरं. आता सगळं हे जे काही सुरू आहे त्याची भाजपाला गरज नाही. ते तसंही जिंकणार आहेत, हे माझं प्रांजळ मत आहे.

पण हे शेवटी राजकारण आहे ना, जिथे जिथे आपला कमकुवतपणा आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण जिंकून येऊ की नाही अशी शंका आहे, तिथला माणूस घेणं, हे शेवटी राजकारणच आहे. हे सगळं याआधी देखील होत होतं. यातून जर जनतेची सोय होणार असेल,

आपली प्रगती होणार असेल ना, तर मग तुम्ही कोणालाही घ्या, कोणालाही काढा. फक्त आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला उत्तम सोयी द्या. देश चांगल्या पद्धतीनं घडवा. जगात आता भारताचं नाव अभिमानानं घेतलं जात आहे. भारतात खूप मोठे बदल घडतायत जे चांगले आहेत.”

युट्यूबर्सच्या सत्कारावर शशांक म्हणाला…

“काही दिवसांपूर्वी युट्यूब चॅनल असणारे म्हणजेच युट्यूबर्स आहेत, त्यांचा मोठ्या पद्धतीनं सत्कार करण्यात आला. हे स्मार्ट राजकारण आहे. छोट्या पातळीवर तुम्हाला प्रमोट करणारी माणसं आहेत, त्यांचा स्वतः हून तुम्ही सत्कार करणं. हेच एक उभारी देणं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *