शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…

आशिष कुडके :- वर्धा : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढणे सुरू झाल्याचे पहिले चिन्ह म्हणजे उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या रॅली, असे म्हटल्या जाते. ही रॅली शक्ती प्रदर्शन करणारी असावी असा प्रमुख पक्षांचा हेतू असतो. म्हणून मग गर्दी जमविण्याचे सर्व ते सोपस्कार पार पाडले जातात. इव्हेंट प्रिय भाजप यात आघाडीवर राहण्याचे नेहमीचे चित्र मात्र दिसलें नाही. हजारभर लोकं, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मिळून दिसलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे याच स्थळावरून काल मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांची रॅली निघाली होती. त्यात सहभागी लोकं, दिसणारा उत्साह, नारेबाजी यामुळे शहरात ही रॅली चर्चेचा विषय झाली होती. त्याचीच तुलना आज या परिसरातील नागरिक करीत होते. आज मजा नही आया, असे स्वर उमटले. हे असे का घडले, या प्रश्नावर बोलतांना भाजपचे लोकसभा क्षेत्र प्रचारप्रमुख सुमित वानखेडे म्हणाले की आमचे एवढेच नियोजन ठरले होते.

शक्ती प्रदर्शन प्रकार नव्हता. पुढे आमचे मल्टीपल इव्हेंट आहेतच. आणि मुख्य म्हणजे आम्ही ही लढाई बूथ पातळीवर लढणार आहोत. गर्दी, मोठ्या सभा असे काही प्रकार नाहीत असा खुलासा त्यांनी केला. भाजपचे हे असे प्रचारतंत्र असले तरी सर्व सामान्य जनतेने मात्र रॅली फसली, असाच चर्चेचा सूर काढल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *