आशिष कुडके :- सोलापूर : सोलापूर शहरातील एका शिक्षक सन्मान सोहळ्यात लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रणिती शिंदेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भाजप पक्षाकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे-नाटे आरोप केले जात आहेत.
मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर खोटे आरोप होतात. प्रणिती शिंदे म्हणाल्या, खोट बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही भाजपची जुनीच परंपराच आहे. भाजपने गेल्या १० वर्षात सोलापूरच्या प्रश्नावर काहीच काम केलं नाही. त्यामुळेच दरवेळी सोलापूरची निवडणूक आली की भाजपकडून प्रचारादरम्यान फक्त शिंदे साहेबांवर खोटे आरोप केले जातात आणि सोलापूरकरांच्या मूळ मूलभूत प्रश्नांपासून पळ काढला जातो.
जुनी पेन्शन योजनेला पाठिंबा…
सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. राज्यात आणि देशात आघाडीचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले.
यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने, सोलापूर काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उद्योजक श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
खोटे फोटो प्रसिद्ध करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतील……
भारतीय जनता पक्षाकडून माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत मला शंका आहे. त्यासाठी भाजपची संपूर्ण टीम कामाला लागली आहे. मात्र भाजपच्या या षडयंत्राला सर्वसामान्य सोलापूरकर जनता आता बळी पडणार नाही, याची मला खात्री असल्याचा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
दहा वर्षात रावण राज्य होते का ?…..
सध्या भाजपकडून सोलापुरात आता रामराज्य येणार असल्याचा प्रचार केला जात आहे. म्हणजे गेली दहा वर्षे सोलापुरात रावणाचं राज्य होतं, असं भाजपवाल्यांना वाटत आहे का? भाजपवल्यांकडूनच तसा प्रचार केला जात असल्याचा टोलाही प्रणिती शिंदे यांनी भाजप लगावला आहे. तसेच गेली १० वर्ष भाजपकडे देशाची, राज्याची, सोलापूरची सत्ता होती. मात्र, भाजपने सोलापूरच्या विकासासाठी काय कामे केली? असा सवाल उपस्थित करत शिक्षक सन्मान सोहळ्यात जुनी पेन्शन लागू करू असे आश्वासन दिले.