कास्ट्राईब शिक्षक महासंघाने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट, शिक्षक बदली प्रक्रिया लवकर सुरू करण्याची केली विनंती..!

| पुणे | महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांनी बुधवारी ११ ऑगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची विनंती केली .

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल सविस्तरपणे दै. लोकशक्ती शी बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, कास्ट्राईब शिक्षक महासंघाने ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागाला वेळोवेळी दिलेल्या निवेदनाची दखल शासनाने घेतली असून बुधवारी मंत्रालयात या सर्व विषयावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये संचमान्यता, टीईटी परीक्षा, अनुकंपा भरती आणि नियमित भरती, शिक्षक भरती वेळापत्रक , शिक्षक संवर्गासाठी रोस्टर मान्यता, शाळा सुधार खात्यात समुदाय सहभाग, जिल्हा परिषद आणि जागतिक बँक प्रकल्प, शाळा दुरुस्ती अनुदान, झेडपी उपक्रम , शाळांसाठी पंधराव्या वित्त आयोगचा जि .प . कर निधी ‘शिक्षकांना कोव्हीड ड्युटी दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे, समग्र शिक्षा अंतर्गत अभियांत्रिकी पदांच्या रिक्त जागा व कंत्राटी भरती , जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित शाळा एकाच परिसरात घेण्याबाबत या बैठकीत विचार विनिमय करून निर्णय होणार आहे .

या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अपर मुख्यसचिव ग्रामविकास विभाग, अपर मुख्यसचिव शालेय शिक्षण विभाग, संबंधित उपसचिव ग्रामविकास विभाग, शिक्षक बदल्याबाबतच्या समितीतील सर्व सदस्य, शिक्षक बदली बाबतच्या सॉफ्टवेअरच्या समितीतील सर्व सदस्य, इतर संबंधित अधिकारी ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभाग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने वेळोवेळी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांची पूर्तता होणार असून त्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *