केरळ मध्ये हे मेट्रो मॅन असणार भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार..!

| केरळ | मागील काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले व मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ई श्रीधरन हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा आमच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती केरळमधील एमओएस एमईए व भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.

केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असं श्रीधरन भाजपात प्रवेश करण्या अगोदरच म्हणाले होते.

तसेच, या वर्षी केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्यास राज्यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प उभारणे आणि राज्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास प्राधान्य दिलं जाईल असं देखील श्रीधरन यांनी सांगितलं होतं.

पीटीआयशी बोलताना श्रीधरन यांनी पक्षाने ठरवल्यास आपण विधानसभा निवडणूक लढण्यास आणि त्यानंतर पक्ष विजयी झाल्यास मुख्यमंत्री पद संभाळण्यासही तयार असल्याचे म्हटलं होतं.

२००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ई. श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत.

केंद्र सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध करण्याची फॅशनच देशात आलीय असा टोला शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना श्रीधरन यांनी लगावला होता. शेतकऱ्यांना नवीन कायदे समजून घ्यायचे नाहीत किंवा राजकीय हेतूमुळे ते हे कायदे समजून घेऊ इच्छित नाहीत, असं देखील ते म्हणाले होते.

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात २७ मार्च ते २९ एप्रिल अशा दोन महिन्यांच्या कालावधीत मतदान होईल. त्यांची मतमोजणी २ मे रोजी होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *