अमरावती : मागच्या अनेक वर्षापासून नवनीत राणा जेलमध्ये जातील, असा वल्गना विरोधक करत होते. माझी छोटी छोटी मुलंही मला विचारायची, आई तू नेमकं काय केलंय, ज्याच्यामुळे तुला तुरुंगात जावं लागेल पण सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला, अशा भावना व्यक्त करताना महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
नवनीत राणा यांच्या बहुप्रतिक्षित जात प्रमाणपत्राचा राखीव निकाल गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. राणा यांचा जातीचा दाखला बनावट ठरविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.
न्यायालयाचा हा निर्णय लोकसभा लढवित असलेल्या नवनीत राणा यांना मोठा दिलासा मानण्यात येतोय. न्यायालयाच्या निर्णयानंतर राणा यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
माझ्या बदनामीचा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला पण….
नवनीत राणा म्हणाल्या, गेल्या १२ वर्षापासून मी संघर्ष करत होते, त्या संघर्षाला मला न्याय मिळाला. दरम्यानच्या काळात विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला पण आज सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आज दूध का दूध पानी का पानी झालं असे सांगताना त्यांनी निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.
विरोधकांकडून टीका पण सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला :
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा नवनीत राणा यांचा विजय नसून शिवरायांच्या, बाबासाहेबांच्या विचारांने चालणाऱ्या जनतेचा विजय आहे. विरोधकांनी माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली, महिला म्हणून दाबण्याचा प्रयत्न केला, पण मी संयम सुटू दिला नाही, लोकांना विश्वास दिला.
मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, असे लोकांना सांगत राहिले. लोकांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. अमरावतीकरांनी मला २०१९ ला खासदार केलं. आज मी पुन्हा मैदानात आहे, माझ्या उमेदवारीचा अर्ज भरलाय, मला पूर्ण विश्वास आहे, यावेळीही मला लोक अमरावतीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, असेही राणा म्हणाल्या.
नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू…
माझ्या जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा प्रचार विरोधकांनी केला. जाहीर सभांच्या माध्यमातून माझ्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. मला जेलमध्ये टाकण्याचे काहींचे मनसुबे होते. माझी लहान लहान मुलं मला विचारायची आई तू नेमकं काय केलंय, ज्याच्यामुळे तुला तुरुंगात जावं लागेल.. अशा भावना व्यक्त करताना नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
आता मोदी माझ्यासोबत…
जात प्रमाणपत्र निकालाच्या कठीण काळात रवी राणांनी मला नेहमी विश्वास दिला, कमजोर पडायचं नाही, असे ते नेहमी सांगायचे. शेवटी त्यांचे म्हणणे खरे झाले, आता तर माझ्यासोबत मोदीसाहेब आहेत, मी घाबरणार नाही, असे त्या म्हणाल्या.