चिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..!

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सिंधुदुर्गातील बहुचर्चित असलेल्या चिपी विमानतळाचे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला आयोजकांकडून अनेक मंत्री, नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मात्र, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळाल्यानंतर ते चांगलेच संतापले. ‘हा काही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या घरचा कार्यक्रम किंवा मुलाचं लग्न नाही, म्हणून आमंत्रण दिले गेले नाही, असे राणे म्हणाले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत माहिती मिळताच त्यांनी मुंबईत तत्काळ पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. राज्यात कुठल्याही नव्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असेल तर विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण द्यायला हवे.

याबाबत कुठलाही नियम नसला तरी काही प्रथा-परंपरा असतात. जे काही राज्यातल्या सरकारने केले आहे ते चुकीचे आहे. हा काही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या घरचा कार्यक्रम नाही. मुलाचं लग्न नाही. ‘फडणवीस यांच्याशी मी आमंत्रण न दिल्याच्या कारणासंदर्भात बोललो. मात्र, या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये असे फडणवीस म्हणाले. सिंधुदुर्गाच्या आणि राज्याच्या हिताचे काम होत ते महत्त्वाचे आहे, असेही ते मला म्हणाले. ते सहनशील आहेत. त्यांच्या जागी मी असतो तर चित्र वेगळेच असते, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *