Congress Manifesto For 2024 LokSabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला 2 आठवड्यांहूनही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेसच्या नवनियुक्त राज्यसभा खासदार सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधींचा फोटो दिसून येत आहे.
मोदी सरकारविरोधात लोकांनी एकत्र येऊन लढावं
खरगे यांनी देशातील लोकांनी एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात लढलं पाहिजे असं आवाहन केलं. “विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. निवडणूक लढण्याची सध्याची स्थिती नाही. अनेक प्रकरणांमध्ये आमच्या पक्षाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
लोकशाहीला वाचवण्याची गरज आहे. देशाच्या संविधानाला वाचवण्याची गरज आहे. देशातील लोकांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील हुकुमशाही सरकारविरोधात लढलं पाहिजे. या सरकारला सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे,” असं खरगे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
चिदम्बरम म्हणाले, ‘न्याय हाच गाभा’
पी चिदम्बरम यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधताना भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास काय होऊ शकतं यासंदर्भातील इशारा आम्ही 2019 मध्येच दिला होता असं सांगत आमच्या जाहीरनाम्याचा मुख्य गाभा न्याय हा असल्याचं सांगितलं. “आमच्या जाहीरनाम्याची मुख्य थीम न्याय ही आहे. मागील 10 वर्षांमध्ये न्यायासंदर्भातील प्रत्येक घटक नाकारण्यात आला आहे.
खास करुन मागील 5 वर्षांमध्ये हे प्राकर्षाने दिसून आलं आहे. प्रसारमाध्यमांना ठाऊक असेल तर 2019 साली आम्ही भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास 2019 ते 2024 दरम्यान काय घडू शकतं याचा इशारा दिला होता,” असं चिदम्बरम म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “सुटाबुटातील नेते म्हणून नाही तर तळागाळात काम केलेले कार्यकर्ते म्हणून आम्ही देशात काय घडू शकतं याबद्दल भाष्य केलं होतं,” असंही चिदम्बरम यांनी म्हटलं.