सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

| मुंबई | राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची(Election) घोषणा झाल्यानंतर सहकारी समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात कोरोनामुळे सहकारी(Co-Operative Sector Election) समितीची निवडणूक ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका देखील लांबणीवर पडणार नाहीत असे राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने म्हटले आहे.

प्राधिकरणाने डिसेंबर २०२० पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या २० सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. कोविड-१९ च्या निर्बंध तसेच संसर्गाच्या कारणामुळे अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका होवू शकल्या नाहीत. मात्र, आता निवडणूका कोविड-१९च्या कारणाने लांबवणे योग्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने एक स्वतंत्र पत्रक जारी केले आहे.

आज महाविकास आघाडी सरकारच्या सहकार विभागाची बैठक झाली. या बैठकीमध्ये निवडणूक स्थगित करण्यात प्रस्ताव पुढे करण्यात आला नव्हता. राज्यात सहकारी समित्यांपैकी हौसिंग सोसायटीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दूध संघाची सहकारी समिती यांच्या निवडणुका बाकी आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर या निवडणुका होतील.

प्राधिकरणाने येत्या २० सप्टेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी मतदारांच्या याद्या सहा महिन्यांत तयार करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका :

कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे बाजार समित्या, विविध कार्यकारी संस्था, पंतसंस्थांसह राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. या निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया जानेवारी २०२१ पासून सुरू केल्या जाणार होत्या, मात्र त्यांना नंतर स्थगिती देण्यात आली होती. त्यासाठी जिल्ह्यांचा निवडणूक आराखडा तयार करण्याचे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोना नियमांचे पालन आवश्यक :

सहकार क्षेत्रातील बाजार समित्या, विविध कार्यकारी सेवासंस्था, पतसंस्था आदींच्या निवडणुका येत्या काळात होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन आदी उपाययोजना करण्याचे आदेश प्राधिकरणाचे आहे. आराखड्यातील प्रथम टप्प्यात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमानुसार घेण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहे. असे असले तरी अडीचशे व त्या पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून इतर सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *