दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केले होते. २०१९ मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी टीका तटकरे यांनी केली होती.

त्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी रायगड लोकसभेचे उमेदवार आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही. मला बोलायला भाग पाडू नका. आदरणीय शरद पवार यांची साथ सोडली. त्याचप्रमाणे अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? असा प्रश्न त्यांनी तटकरे यांना विचारला आहे.

तसेच ‘तटकरे साहेब, तुमच्यासारखा केंद्रीय यंत्रणांना घाबरुन अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांची गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये जायचे असते, तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमीरा चुकवण्यासाठी तुमच्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो.

आता त्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवार साहेबांची साथ सोडली. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश कधी घेताय ते सांगा. अजूनही बोलायला भाग पाडले तर अनेकांना ते परवडणार नाही,’ अशा शब्दात रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

२०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पवार साहेबांकडून रोहित पवार यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालं नाही. त्यानंतर कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी हे महाशय पिताश्रींना घेऊन कोणाला किती वेळ तिष्ठत राहून वाट बघून भेटत होते हे मला माहिती आहे.

त्यामुळे अशा सुमार बाल बुद्धीच्या आणि राजकारणात अगदी नवख्या असलेल्या व्यक्तीबाबत आपल्याला फारसं बोलायचं नाही, असंही तटकरे यांनी रोहित पवारांना म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *