IPL: इंडियन प्रिमिअर लीगमधील 16 व्या सामन्यामध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला व्यवस्थापकांनी आणखीन एक मोठा धक्का दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाविरुद्धचा सामना 106 धावांनी गमावल्यानंतर आयपीएल समितीने दिल्लीच्या संघातील प्रत्येक खेळाडूला सामन्यासाठी मिळणाऱ्या मानधनामधून 6 लाख रुपये कापून घेतले आहेत. ही रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्णधार ऋषभ पंतला तर तब्बल 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलनेच यासंदर्भातील माहिती दिली आहे. नक्की घडलंय काय हे पाहूयात…
पंतला एकूण 36 लाखांचा फटका
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने ओव्हर रेट नियंत्रणात ठेवला नाही. त्यामुळेच स्लो ओव्हर रेटचा ठपका ठेवत दिल्लीच्या संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. केकेआरच्या संघाविरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानामध्ये झालेल्या सामन्यामध्ये नियोजित वेळेत आवश्यक असतात तेवढ्या षटकांची गोलंदाजी करण्यात दिल्लीच्या संघाला अपयश आलं.
त्यामुळेच यासाठी मुख्य दोषी कर्णधार पंतला ठरवत त्याची संपूर्ण मॅच फी म्हणजेच 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणजेच हा सामना खेळल्याबद्दल पंतला एक रुपयाही मिळणार नाही. यापूर्वीच्या सामन्यातही दिल्लीच्या संघाने नियोजित वेळेत आवश्यक षटकं टाकली नव्हती.
त्यामुळेच पहिल्यांदा अशी चूक झाली म्हणून पंतच्या मॅच फीपैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली होती. त्यावेळी पंतला 12 लाखांचा फटका बसला होता. म्हणजेच मागील आठवडाभरामध्ये 2 सामन्यांमधील स्लो ओव्हर रेटमुळे पंतला तब्बल 36 लाखांचा फटका बसला आहे.
आयपीएलच्या व्यवस्थापनाने काय म्हटलं आहे?
कोलकाताविरुद्धच्या सामन्यामध्ये पंतबरोबरच संघातील इतर सर्व खेळाडूंवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सामन्यातील एकूण मानधनापैकी 25 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. “दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवण्यात येत आहे. टाटा इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हा प्रकार घडला.
पंतच्या संघाकडून ही चूक दुसऱ्यांदा झाला असल्याने आयपीएलच्या नियमावलीनुसार पंतला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात येत आहे. तसेच प्लेइंग इलेव्हन संघातील खेळाडू आणि इमॅप्ट प्लेअर्सला प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा 25 टक्के मानधन कपात असा दंड सुनावला जात आहे,” असं आयपीएलने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
केकेआर पहिल्या तर दिल्ली 9 व्या स्थानी…..
दमादर फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने तब्बल 272 धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची दमछाक झाली. दिल्लीचे फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद होत गेल्याने त्यांना पूर्ण 20 षटकं मैदानावर टिकूनही राहता आलं नाही.
17.2 ओव्हरमध्ये दिल्लीचा संघ 166 धावांवर तंबूत परतला. विशाखापट्टणमममधील मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकात्याने अष्टपैलू कामगिरी करत सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच कोलकात्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर 100 हून अधिक धावांनी पराभव झाल्याने दिल्लीचा संघ 10 पैकी 9 व्या स्थानावर फेकला गेला आहे.