डिजिटल युगातही वर्तमानपत्रातील विश्लेषणात्मक बातम्या वाचण्यासाठी वाचक उत्सुक – डॉ. महेंद्र कदम

| महेश देशमुख / सोलापूर | प्रेक्षकांनी दिवसभरात टीव्हीवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रेकिंग न्यूज बघितल्या असल्या तरी त्याच बातम्यांचे दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात कशा प्रकारे विश्लेषण केले आहे हे वाचायला वाचक उत्सुक असतात. अशा वेळी बातमीपलीकडे जाऊन विश्लेषण करून वाचकांना वाचनीय बातम्या देण्याचे बौद्धिक काम पत्रकार करतात असे मत सुप्रसिध्द साहित्यिक व राज्य रंगभूमी परिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी पत्रकार दिनानिमित्त टेंभुर्णीतील यश उद्योग समुहाच्या वतीने आयोजित पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केले. पुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले, दुसऱ्या व्यक्तीला मोठेपणा दिल्यास स्वतः लहान होत नाही उलट आपला मोठेपणा समाजाला समजतो.

यश उद्योग समुहाचे संस्थापक-अध्यक्ष गोरख खटके-पाटील यांच्या हस्ते रंगभूमी परिक्षण मंडळाच्या सदस्यपदी प्राचार्य महेंद्र कदम सर यांची निवड झाल्याबद्दल व पत्रकार दिनानिमित्त टेंभुर्णी प्रेस क्लबच्या नुतन अध्यक्षपदी संतोष पाटील, उपाध्यक्षपदी सतिश काळे, सचिवपदी सचिन होदाडे यांची तसेच टेंभुर्णी शहर-ग्रामीण पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी धनंजय मोरे, उपाध्यक्षपदी गणेश पोळ यांची निवड झाल्याबद्दल यशोदिप कॉम्प्युटर एज्युकेशन,टेंभुर्णी येथे सत्कार समारंभ पार पडला. फेटा बांधून व मराठा मार्गचे बळीराजा विशेषांक हे पुस्तक देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य औदुंबर महाडिक, सोमनाथ नाळे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वाघमारे, पत्रकार अनिल जगताप, पत्रकार प्रदिप पाटील, शिक्षक सहकार संघटनेने राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख, युवा उद्योजक अतुलभाऊ सरडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख खटके-पाटील यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार निलेश देशमुख यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *