दत्ता इस्वलकरांना अखेरचा लाल सलाम…!

कामगार नेते राष्ट्र सेवादल कार्यकर्ते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने एक लढाऊ नेतृत्व हरपले आहे.

जागतिक कामगार चळवळीतील ऐतिहासिक गिरणी संपात वाताहात झाल्यानंतर, लढाऊ गिरणी कामगारही हतप्रभ झाला होता. पण त्यांच्यात पुन्हा लढण्याची इर्षा निर्माण करण्याचे काम दत्ता इस्वलकरांनी केले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भायखळ्याच्या न्यू ग्रेट मिलसमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाने गिरणी कामगारांच्या लढ्यात पुन्हा प्राण फुंकण्याचे काम केले. याची अंतिम परिणिती गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याच्या निर्णयात झाली! बंद पडलेल्या उद्योगातील कामगारांना त्याच उद्योगाच्या जमिनीवर घरे देण्याचा असा निर्णय प्रथमच झाला असावा.
याच काळात दत्ताजी अनेक वेळा मा.कर्णिक साहेबांचा सल्ला घेण्यासाठी आपल्या कार्यालयात येत असत.

तेंव्हा आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांसोबत आमच्याच वयाचे होऊन ते आम्हाला आंदोलनाचे महत्त्व पटवून देत. कोणत्याही आंदोलनाची ताकद ही तरूण कार्यकर्तेच असतात, असंही ते कायम आम्हाला सांगत. गिरणी कामगारांच्या आंदोलनात कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून काम करताना या पिचलेल्या गिरणी कामगारांच्या लढ्याला कार्यकर्त्यांची किती आवश्यकता आहे, हे सतत जाणवत रहायचे. मा. कर्णिक साहेबांनी आपल्या संघटनेचे नवनेतृत्व घडवण्यासाठी मध्यवर्तीच्या कार्यालयात होतकरू कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करून अनेक मान्यवरांना मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केले होते. त्यातही इस्वलकरांनी आपल्या अनुभवातून उत्तम मार्गदर्शन केले होते..

इस्वलकरांच्या जाण्याने आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचा हक्काचा मार्गदर्शक हरवलाय. आता गिरणगावात फिरताना इस्वलकरांचा तो सदोदित हसरा चेहरा कायम आठवत राहिल. फारच वेदनादायी आहे हे सारं… !
दत्ता इस्वलकरांना अखेरचा लाल सलाम…!

अविनाश दौंड, सरचिटणीस मुंबई जिल्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *