लसीकरण केंद्र उभारणी धोरण उभारण्यासंबंधाने ठाणे – नवी मुंबई मनपा धर्तीवर कार्यवाही व्हावी – आमदार राजू पाटील

| कल्याण / लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनाला रोखण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील खासगी कार्यालये आणि गृहसंकुलांना रुग्णालयांच्या संलग्नतेने लसीकरण केंद्र उभारण्याबाबत धोरण तयार करण्याबाबत आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी मागणी केली आहे. केडीएमसीने हे धोरण राबविल्यास कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर टाच येऊ शकते, याकडे आमदार राजू पाटील यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकांकडून कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहिम राबविता यावी, यासाठी रुग्णालयांशी संलग्नता करुन शहरांतील विविध खासगी आस्थापना आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण करण्याचे धोरण त्या त्या महानगरपालिकांनी निश्चित केले आहे.

त्यामध्ये आस्थापनांना व गृहसंकुलांना लसीकरणाची जबाबदारी देताना काही अटी व नियम घालण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांप्रमाणे धोरण तयार करुन लसीकरणाला परवागनी मिळावी, अशी मागणी विविध खासगी आस्थापना आणि लहान-मोठ्या गृहसंकुलांमार्फत होत असल्याकडे आमदार राजू पाटील यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

लसीकरणाचे धोरण तयार करताना त्या-त्या आस्थापनांमधील कर्मचारी, गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास असलेले रहिवासी, घरगुती काम करणाऱ्या व्यक्ती, सुरक्षारक्षक, माळी, लिफ्टमन, वाहनचालक यांना या लसीकरणाचा लाभ घेता येऊ शकतो व लसीकरणाला गती मिळून कोरोना महामारीला रोखण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. देशासह राज्यामध्ये व्यापक लसीकरण राबविण्याची आवश्यकता पाहता येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा होण्याची शक्यता असून काही विदेशी कंपन्यांना ओपन मार्केटमध्ये लस विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे अशावेळी ज्या खासगी आस्थापनांना व गृहसंकुलांना अशा प्रकारचे लसीकरण राबविण्याची इच्छा असेल त्यांना महानगरपालिकेकडून स्वंतत्र परवानग्या देण्याबाबत धोरण तयार करण्याची प्रक्रिया तातडीने तयार करावी लागेल. जेणेकरुन आताच यंत्रणा तयार होऊ शकते. त्यासाठी लागणाऱ्या डॉक्टर्स, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, इतर आरोग्य कर्मचारी, इंटरनेट सुविधा, फर्निचर, रुग्णवाहिका, औषधे, आदी सुविधा असल्याच्या खातरजमा करुन महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत परवानग्या देण्यास कोणतीही हरकत नाही.

त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील विविध अस्थापनांची कार्यालये आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरणासाठी स्वतंत्र धोरण तयार करुन तश्या त्यांना परवानग्या द्याव्यात, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *