पिता-पुत्राची जोडी एकत्रच लोकसभेला? सुजात आंबेडकर रिंगणात उतरण्याची चिन्हं, मतदारसंघ कोणता ?

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सुजात आंबेडकर नशीब आजमावण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास पिता-पुत्र एकाच वेळी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा दुर्मिळ योगायोग घडेल.

महाविकास आघाडीत सहभागाच्या शक्यता मावळल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर यांनी एकामागून एक उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली.

 

बारामतीत सुप्रिया सुळे, तर रामटेकमध्ये काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितने घेतला. अद्याप पाचव्या टप्प्यातील मुंबईतल्या उमेदवारांची घोषणा त्यांनी केलेली नाही.

 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून खुद्द प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी गेल्या वेळीप्रमाणे पुन्हा एकदा अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं आहे.

 

दक्षिण-मध्य मुंबईतील जातीय समीकरणं………….

वंचित बहुजन आघाडी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवार देण्याचं कारण म्हणजे या भागात असलेले दलित – बहुजन मतदारांचं प्राबल्य. इथे सध्या १६ टक्के दलित-बहुजन, तर २३ टक्के मुस्लिम मतदार आहेत.

 

दलित समाजाचे प्रामुख्याने चेंबूर, वडाळा भागात वास्तव्य आहे. तर मुस्लिम समाज चेंबूर, अणुशक्तीनगर या भागात मोठ्या प्रमाणात आहे. या दोन मोठ्या समाजांचे जातीय समीकरण पाहता सुजात येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

 

२०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी…………..

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना ५४ टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना ३४ टक्के मतं मिळाली होती.

 

तर वंचितच्या संजय भोसले यांना ८ टक्के मतं मिळाली होती. या वेळेस सुजात यांना वंचितच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होते का, हे पाहावं लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *