| नागपूर | शिवसेनेला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात संपर्कमंत्री एकनाथ शिंदेच्या रणनीतीचा फायदा झालाय. त्यामुळेच या भागात शिवसेनेने मुसंडी मारलीय. या ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सेनेच्या खूप ग्रामपंचायती वाढल्या आहेत. या निवडणुकांसाठी कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदेंवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतींवर, तर गोंदिया जिल्ह्यात २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच बसणार आहे.
पूर्व विदर्भात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला होता. पक्ष संघटनेलाही मोठी खिळ बसली होती, पण या ग्रामपंचायत निकालात चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिवसेनेला मोठं यश मिळालंय. चंद्रपूर जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा संरपंच आणि ३० ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच बसेल, तर गोंदिया जिल्ह्यात २० ग्रामपंचायती आणि भंडारा जिल्ह्यात १७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकला, असा दावा शिवसेनेनं केलाय.
या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला कितीतरीपट जास्त ग्रामपंचायती मिळाल्याय. त्यामुळे कॅबिनेट मंत्री आणि या जिल्ह्यांचे संपर्क मंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार आणि शिवसैनिकांचे आभार मानले. पूर्व विदर्भात शिवसेना मजबूत करण्यासाठी, कॅबीनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आलीय.
स्थानिक पक्षबांधणीकडे शिवसेनेनं वर्षभरापासून अधिक लक्ष द्यायला सुरुवात केलीय. या ग्रामपंचायत निवडणुकीतंही शिवसेनेनं मोठी ताकद लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात प्रचार केला. निवडणुकीचं काटेकोर नियोजन केलं. त्याचं यश या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आलंय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या या यशानं पूर्व विदर्भात पुन्हा एकदा शिवसेनेला चांगले दिवस यायला सुरुवात झाली आहे, असंच दिसतंय.