गणेश नाईक यांनी बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांचा देखील विश्वासघात केला – जितेंद्र आव्हाड

| नवी मुंबई | पूर्वीच्या काळात गणेश नाईक यांना राजकारणात आदराचे स्थान होते. मात्र, भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना साधी बसायलाही खुर्ची मिळाली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण नाईक यांनी त्यांना धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी अशाचप्रकारे विश्वासघात केला होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ते रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी गणेश नाईक आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. काही वर्षांपूर्वी मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, असे गणेश नाईक म्हणायचे. पण हेच तिकडे पळाले, असे आव्हाड यांनी म्हटले.

भाजपमध्ये मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमध्येच कुस्ती :

भाजपमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात कुस्ती आहे. मंदा म्हात्रे या आपल्याच आहेत. गणेश नाईक आपल्यातून गेले. पण बहीण आपलीच आहे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले.

‘भाजपने सर्वांना धंद्याला लावले’ 

या भाजपने सर्वांना धंद्याला लावले आहे. त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडले नाही. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे. मग आपले शेतकरी कुठे जातील? ज्या सहकार चळवळीने महाराष्ट्राला मोठे केले त्याच सहकार क्षेत्रात भाजपने घोळ घातल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

नवी मुंबईची धनशक्ती मोडीत काढू: शशिकांत शिंदे

नवी मुंबईत नगरेसवकांची यादी पाहिली तर महाविकासआघाडी भक्कम आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केला जाईल. पण आपण जनशक्तीच्या बळावर निवडून येऊ, असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.भाजपवाले सतत सरकार पडेल अशी चर्चा घडवून आणतात. मात्र, आमचे संजय राऊत त्यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेदेखील खंबीर आहेत. तेव्हा आता नवी मुंबईतील धनशक्ती मोडून काढायची, असा निर्धार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *