गणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.?

| नवी मुंबई | दहा जूनच्या मानवी साखळी आंदोलनानंतर विमानतळ आंदोलनाचा दुसरा टप्पा सिडको घेराव हा नवी मुंबई मनपा मुख्यालय समोर आज आयोजित केला होता. हजारो ग्रामस्थ या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने जनसागर उसळला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब करावे या मागणीसाठी सिडकोला घेराव घालण्यासाठी ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी कऱ्हाडी, भंडारी, कुणबी या समाजाच्या भूमिपुत्रांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

आजच्या सिडको घेराव आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. पण तरीही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे दि.बा.पाटील यांचे विमानतळाला नाव द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपाच्या मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे सुभाष भोईर ही सगळी नेतेमंडळी आंदोलनात सहभागी झाली होती. पण गणेश नाईक आंदोलनात कुठेही दिसेल नाहीत. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

गणेश नाईक हे नवी मुंबईतील एक मोठं प्रस्थ आहे. तिथेच हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, आणि आज गणेश नाईकच आंदोलनामध्ये नाहीत असे चित्र दिसले. गणेश नाईक यांची दोन्ही मुले संदीप आणि संजीव नाईक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ग्रामस्थांनी दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर या नामकरण मुद्द्याला राजकीय वळण लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा फिस्कटल्यावर भूमिपुत्र आंदोलनावर ठाम होते. अखेर हाती लाल पांढरा ध्वज हाती घेवून घोषणांच्या निनादात आंदोलनकर्ते नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पाम बीच मार्गावर सागर संगम रेल्वे स्थानक रेल्वे उड्डाणपुलाखाली जमा झाले. यावेळी उरण, पनवेल, अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, ठाणे ग्रामीण भागातून हजारो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

मनसेचे आमदार राजू पाटील,भाजपचे प्रशांत ठाकूर,आमदार मंदाताई म्हात्रे, महेश बालदी, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नेत्यांची हजेरी होती. मात्र माजी मंत्री ज्येष्ठ आमदार गणेश नाईक सदर ठिकाणी उपस्थित नसल्याने आंदोलकांमध्ये चर्चा आणि नाराजीचा सूर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *