गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे; त्यामुळे घवघवीत यश मिळवा – ना. जयंत पाटील

| परभणी | गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे घवघवीत यश मिळवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दाखल झाली असून यावेळी गंगाखेड – पालम – पूर्णा विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

पक्षातील लोकांशी हितगुज साधण्यासाठी ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आहे. पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने, विचारमंथन करण्यासाठी या भागात यात्रा काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे पराभव झाला, या पराभवाचे रुपांतर आपल्याला विजयात करायचे आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. मतदारसंघातील लोकांनी मतदारसंघात एक चांगले वातावरण निर्माण करावे, मरगळ झटकून पुन्हा नव्याने सुरुवात करावी. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले तर आपण पुन्हा या मतदारसंघात विजय मिळवू, अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या पक्षाचं मूळ पक्कं करणं, राष्ट्रवादी हे आपलं घर पक्कं करणं हा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा उद्देश असल्याचे यावेळी सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. २०२४ मध्ये पक्षाकडे असलेल्या जागा आपल्याला राखायच्या आहेतच शिवाय पराभव झालेल्या जागाही पुन्हा जिंकून भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. लोकशाही म्हणजे काय असते याचं जिवंत उदाहरण आदरणीय शरद पवार साहेबांनी २०१९ मध्ये जगासमोर आणि राज्यात सत्ता स्थापन करुन दाखवून दिले आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. सत्तेत असताना आणि विरोधात असताना पक्ष पाहिला. आता सत्ता असताना प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला जाऊन भेटण्याचे एकमेव उदाहरण जयंत पाटील यांच्या रुपाने पाहायला मिळत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

परभणीत आपली लढाई परंपरागत राष्ट्रीय समाज पक्षासोबत आहे. भले ही लढाई कुणासोबतही होवो परंतु विजय आपलाच होणार या ताकदीने आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत घड्याळाचा गजर झालाच पाहिजे ही खूणगाठ बांधा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

संवाद यात्रेत आमदार व परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश वीटेकर, प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आपले विचार मांडले. यावेळी खासदार फौजिया खान, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, परभणी निरीक्षक बसवराज पाटील नागराळकर, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, परभणी निरीक्षक रेखा फड,जिल्हाध्यक्षा भावना नखाते, युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे, तालुकाध्यक्ष माधवराव भोसले आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.