| नाशिक | मंत्रालयीन भेटीच्या व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य कार्यकारणी भेटीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या महत्त्वाच्या कामानिमित्त उपाध्यक्ष झिरवाळ लवकरच नागपूरला रवाना होणार असल्यामुळे कर्मचारी वर्गाच्या समस्यांबद्दल काल पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वेळोवेळी कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवण्याबाबत सहकार्य केल्याबद्दल संघटनेकडून त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे भागवत धुम, वैभव गगे, विलास महाले, अवधुत खाडगीर, संतोष थोरात, मनोहर गांगुर्डे, गुलाब चव्हाण, थाविल सर व जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने बांधव हजर होते.
चर्चेत आलेले महत्वाचे मुद्दे :
✓ जुनी पेन्शन बाबत अजित पवारांशी प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र कोरोनाकाळातील आर्थिक संकटांमुळे थोडी स्थिरता आल्यावर हा विषय घेवू तसेच फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युईटीबाबत संघटनेच्या नेतृत्वाची अजित दादा व शरद पवार साहेबांसोबत बैठक लावुन देण्याचे उपाध्यक्षांनी सांगितले.
✓ शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीसाठी सरकार सकारात्मक असुन लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.
✓ नागपूर विभागीय आयुक्त समितीच्या अहवालाच्या शिफारशी अंतिम करणार्या समितीच्या शिफारशींचा आढावा घेवून नाशिक जिल्ह्यातील व पेसा क्षेत्रातील कर्मचार्यांना योग्य न्याय दिला जाईल.
✓ 6 ऑगस्ट 2002 च्या शासननिर्णयामधील संदिग्धता टाळुन राज्यभरात वरिष्ठ वेतनश्रेणीनंतरही एकस्तर देणेबाबत एकसमान न्याय देण्याविषयी प्रधान वित्त सचिवांना पत्र लिहुन अवगत केले आहे आणि स्वतः याचा आढावा घेणार आहेत.
✓ शालेय वर्गखोल्यांचे अनुदान राज्यस्तरावरून लवकर प्राप्त होत नसल्याने बांधकामास उशीर होत असल्याने त्यांनी SSA राज्य समन्वयक शहारे यांना लगेच फोन लावुन तात्काळ अनुदान देण्यास सांगितले. लवकरच ते मिळणार असुन बांधकामाचा मार्ग मोकळा होईल.