| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांचे निधन झाले. वांद्रे येथील निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन १९७० व १९७७ अनुक्रमे ३७ व ५४ दिवसांचे दोन मोठे कर्मचारी संप कर्णिक यांच्या नेतृत्वात झाले. कर्णिक यांच्या नेतृत्वामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. कर्णिक यांच्या निधनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तसेच, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचीही आठवण अनेकांनी शेअर केली आहे.
” राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हृदय स्थान असलेले माननीय श्री. र ग कर्णिक यांची प्राणज्योत नुकतीच काही वेळापूर्वी मालवली. अत्यंत दुःखद असणारी ही बातमी मला आपल्यापर्यंत पोचवावी लागत आहे. मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात ज्यांचे नाव अमर राहील. त्यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. परमेश्वर मृताचे आत्म्यास चिरशांती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कर्णिक साहेब, अमर रहे! “
-सरचिटणीस अविनाश दौंड, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
” आमचे मार्गदर्शक नेते हरपले असल्याने ही अतिशय धक्कादायक घटना आहे. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक संघटना काम करण्याचा प्रयत्न करत असते. अश्या पितृतुल्य व्यक्तीच्या निधनाने सरकारी कर्मचारी चळवळीची मोठी हानी झाली आहे. कर्णिक साहेब अमर रहे..!”
– श्री. प्राजक्त झावरे पाटील, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन