ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू- ग्रामविकास मंत्री; २० ग्रामपंचायतीवर १ विस्तार अधिकारी पद निर्माण करण्याची ग्रामसेवक संघाची मागणी…!

| सोलापूर / महेश देशमुख | ग्रामसेवक संवर्गाच्या आर्थिक भार विरहित मागण्या तात्काळ मार्गी लावून आर्थिक भार पडणाऱ्या मागण्या कोरोनामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी व्यवस्थित होताच प्राधान्याने सोडवून ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिले.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या मागणीनुसार ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी, ग्रामसेवक संघाचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी वेतन त्रुटींची मागणी मार्गी लावण्यासाठी  ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हि दोन पदे रद्द करून ग्रामसेवक हे एकच पद निर्माण करावे व दुसरी पदोन्नती थेट विस्तार अधिकारी द्यावी. २० ग्रामपंचायतीकरीता १ विस्तार अधिकारी अशी पदे निर्माण करण्यात यावीत यामुळे कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. ग्रामसेवक संवर्गावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, कायम प्रवास भत्ता ३ हजार रुपये करण्यात यावा, फिरती दौरा मंजुरीची जाचक अट रद्द करावी, १ नोव्हेंबर २००५ नंतरील नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांबाबत बैठकीत चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे ग्रामसेवक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष टि.आर.पाटील यांनी सांगितले.

शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष विजय म्हसकर, राज्य सरचिटणीस के.आर. किरुळकर, उपाध्यक्ष सागर सरावणे, राज्य सचिव अनिल जगताप, सोलापूर जिल्हाध्यक्ष टि.आर.पाटील, सोलापूर ग्रामसेवक संघ पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल, नवनाथ गोरे, सागर मोकाशी, सल्लागार विजय माढेकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस.डी.पाटील, एस.पी. कांबळे, अंकुश सुर्वे, अभिजित माने,नवनाथ दोंड इत्यादी सहभागी  होते.

ग्रामसेवकांच्या आर्थिक भार पडणाऱ्या मागण्या बाबत कोरोना संसर्गजन्य परिस्थिती आटोक्यात  येताच अंमलबजावणी बाबत पुन्हा मंत्रालयात बैठक लावण्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

-टि.आर.पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *