नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या काही फोटोंना एकत्र करत तयार करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होतो आहे.
यामध्ये बॅगग्राऊंडला हिंदी ऑडियो ऐकू येतो आहे. व्हिडिओमध्ये केजरीवाल हे एका माइक आणि गिटारसोबत दिसून येत आहेत आणि त्यांच्या चारही बाजुला पोलिस दिसत आहे. या व्हिडिओमध्ये केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील दिसत आहेत.
या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की केजरीवाल हे तुरुंगात गाणी गात आहेत. उत्तर प्रदेश भाजपच्या यूथ विंग सोशल मीडिया प्रमुख ऋचा राजपूत आणि दिल्ली भाजपचे कार्यकर्ते बृजेश राय यांनी ही व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओचं सत्य समोर कसं आलं ?……………..
जेव्हा वेबसाइट The Quint ने या व्हिडिओची तपासणी केली तेव्हा असं दिसून आलं की सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली दृश्यं ही एआयने तयार करण्यात आली असून केजरीवाल तुरुंगात गिटार वाजवत असल्याचा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आहे.
हा व्हिडिओ नीट पाहिला तर त्यावर ‘PaltuPaltann’ नावाचा वॉटरमार्क दिसून येते. जेव्हा द क्विंटने हा शब्द शोधला तेव्हा त्याला एक इंस्टाग्राम खातं सापडलं. हा व्हिडिओ ३० मार्च २०२४ रोजी त्या खात्यावर ‘Memes’, ‘AI’ आणि ‘Songs’ अशा अनेक हॅशटॅगसह शेअर करण्यात आला होता. येथून हे गाणे एआय टूल्स वापरून तयार करण्यात आल्याचे समजतं.