मान आणि पदासाठी आमचा नव्हे तुमचा संघर्ष सुरू आहे, अनिल देशमुख यांनी साधला विखे पाटलांवर निशाणा..!

| मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देत टीका केली आहे. अनिल देशुमख म्हणाले की, “विखे-पाटील जी सरकार एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायलादेखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललाय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच”, अशी खोचक टीका अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर केली आहे.

भाजपकडून शुक्रवारी विजबिल वाढीविरोधात राज्यात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विखे-पाटील यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, “मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती तर मंत्री घोषणा करून मोकळे झाले होते. या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे, मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाला नसल्याचं सांगतात, काँग्रेसचं अस्तित्वच सरकारमध्ये नाही, अशी टीका विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली होती.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीला उपोषणाला बसणार होते. मात्र, त्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन आंदोलन न करण्याची विनंती केली आणि त्यांच्या काही मागण्या पूर्ण करण्याची हमी दिली. त्यावेळी आंदोलन स्थगितीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी राधाकृ्ष्ण विखे-पाटील यांनी भाजप नेत्यांच्या पाठीमागे उभे राहवे लागले होते. त्याची आठवण करून देत अनिल देशमुखांनी विखे पाटलांवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *