मैं अपनी फेव्हरेट हूँ..!


रमा सकाळपासूनच फार उत्साही नव्हती. आज तिच्या कॉलेजच्या ग्रुप ने वेस्टर्न ऑउटफीट मध्ये येण्याचे ठरवले होते. यामुळेच ती उदास होती. नेहमीच ती सैल ढगळया अशा पंजाबी ड्रेस मध्येच असे. बऱ्यापैकी वजन असल्यामुळे आपण जीन्स टिशर्ट किंवा टॉप मध्ये फारच जाड दिसू अशा विचारांनी तिच्याभोवती एक कुंपण घातले होते. त्या कुंपणाला तिनेच दिवसेंदिवस मोठे करीत नेले होते.

रमासारखी अशी बरीच मंडळी आपल्या अवतीभोवती नेहमीच वावरताना दिसतात. ‘नाही गं मी फारच जाड आहे मला फिट कपडे अजिबात सुट होत नाहीत. माझा स्किनटोन गोरा नाही. सो हा कलर मला अजिबात सुट होत नाही. माझे केस फार विरळ आहेत यामुळे ते बांधलेलेच बरे’ असे एक ना अनेक मनात न्युनगंड असतात आणि अशा या न्युनगंडाच्या जाणीवेतून ती व्यक्ती चारचौघात कुठेही खुलून येत नाही. तिच्यातला आत्मविश्वास हा कमी झालेला असतो. ती स्वतःला आहे तशी स्वीकारत नाही. नेहमीच ती स्वतःपासून पळत राहते आणि आपल्या नैसर्गिक भावभावनांपासून देखील.

प्रेमात फार मोठी ताकद सामावलेली आहे. कवी कुसुमाग्रजांनी म्हंटलय ” प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं , मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहचलेलं ” मुळात आपण जे जसे आहोत तसे स्वतःला स्वतःसाठी स्वीकारणे हि बेसीक गोष्ट आहे. हे एकदा स्विकारले की निर्भिड आणि मनमोकळं प्रेम स्वतःवर करता येतं. सत्यापासून पळवाट काढणे हे कधीच कोणत्या समस्येचं निराकरण करीत नाही. मी बरीच मंडळी अशी पाहिली आहेत कि जी स्वतःला स्वप्नरंजनात गुंतवतात किंवा मग भूतकाळात तरी. ‘अरे पूर्वी मी इतकी सडपातळ होते ‘ , ‘पूर्वी मला असे दाट मुलायम केस होते ‘ स्वतःचे जुने फोटो पाहत राहणं किंवा मग स्वतःच्याच मनोविश्वात रमणं. यात फक्त आणि फक्त तुम्ही एकाच ठिकाणी स्वतःला बंदिस्त करता.

आपण जे आहोत जसे आहोत तसे स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे . तुम्ही जर स्वतःवर प्रेम केलेत तर इतरांना प्रेम देऊ शकाल, असं म्हणतात कि दुसऱ्यांना आनंद वाटण्यासाठी मुळात स्वतः आधी आनंदी असावं लागतं. एखादा निराश चेहरा फक्त समोरच्या व्यक्तीवर उदासीनता आणू शकतो. पण हसरा आनंदी चेहरा हा समोरच्या चार लोकांना स्माईल करायला प्रवृत्त करतो. हेच पॉझिटिव्ह व्हाइब्स समोरच्या बरोबर आपला एक बॉन्ड तयार करतात. आपली एक प्रतिमा तयार करतात.

तुम्ही जे आहात तसे छान आहात. उगाचच कोणासारखे बनण्याचा अट्टहास सोडून द्या. दुसऱ्याला कॉपी करून स्वतःमध्ये पेस्ट करणे यात तुमची ओरजिन्यालिटी निघून जाते आणि तुमचे व्यक्तिमत्व फेक किंवा बनावट बनते. कारण दुसऱ्यांची नक्कल करणारा नकलाकर व्हायचे कि स्वतःचे स्वत्व जपून तुम्हीच तुमचे हिरो बनायचे हे सर्वस्वी तुमच्याच हाती असते. उगाच लोकांना खुश करायला, नकली वागायला जाल आणि नाटकी आणि फेक बनाल.

समर्थ रामदासांनी म्हंटले आहे…

मना मानसी दुःख आणूं नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेके देहेबुद्धि सोडुनी द्यावी |
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी |

शेवटी इतकेच म्हणेन “मैं जैसी हुँ वैसी में अपनी फेव्हरेट हुँ” असे एकदा जरा म्हणुन तर पहा. सो मंडळी खुश रहा मस्त रहा आणि इतरांना आनंद देत रहा..!

पल्लवी माने, डेनवर, अमेरिका 


4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *