शिक्षकांच्या बीएलओ नियुक्ती विषयी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा : भारत निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र शासनास निर्देश..

| अहमदनगर | संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून प्राधान्याने फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच नियुक्त्या करण्यात येत आहेत. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने थेट दिल्ली येथे २५ फेब्रुवारी २०२० रोजी भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव रितेश सिंग यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करणे बाबत मागणी केली होती. त्याच अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांना प्राथमिक शिक्षकांच्या बीएलओ नियुक्तीबाबत तात्काळ वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पटेकर यांनी दिली.

भारत निवडणूक आयोग दिल्ली यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात बीएलओची नियुक्ती देताना प्राधान्याने फक्त प्राथमिक शिक्षकांचीच नियुक्ती केली जात आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) यांचे हे निवडणूक विषयक मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम व त्यासंबंधी इतर कामे ही सतत वर्षभर चालू असतात.

उच्च न्यायालय अलाहाबाद यांचे ८ऑगस्ट २०१६ व भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय सचिव यांचे ५ सप्टेंबर २०१६ च्या निर्देशानुसार शिक्षकांना फक्त सुट्टीच्या दिवशी व अशैक्षणिक वेळेतच निवडणूक विषयक काम देता येईल, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना वर्षभर केंव्हाही काम देता येईल व शिक्षकांबरोबरच इतर कर्मचारी यांनाही भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बीएलओ म्हणून नियुक्ती देता येईल असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत प्राथमिक शिक्षकांना शाळेच्या वेळेत व शाळेत शिकविण्याच्या तासांमध्ये हे निवडणूक विषयक संपूर्ण वर्षभर चालणारे बीएलओ चे हे काम देण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या मतदार नोंदणी अभियानासाठी शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी हे काम शिक्षकांना दिले आहे. शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी बीएलओ चे काम दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली जात आहे .

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या बीएलओ नियूक्तीचा हा लढा सुमारे दहा वर्षापासून लढत असून तालुका ते देशस्तरापर्यंत या संघटनेने अतिशय योग्य त्या पाठपुराव्यासह हा विषय तडीस नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. भारत निवडणूक आयोगाने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनानूसार शिक्षकांच्या बीएलओच्या नियुक्तीबाबत योग्य ती गंभीर दखल घेतल्यामुळे लवकरच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कडे वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर होईल आणि तो अहवाल भारत निवडणूक आयोग दिल्ली यांना सादर होईल. या वस्तुस्थितीदर्शक अहवालानंतरच भारत निवडणूक आयोग शिक्षकांना बीएलओ नियुक्ती देणे बाबत योग्य तो निर्णय घेणार असल्यामुळे बीएलओच्या या कामातून शिक्षकांना वगळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. दरम्यान जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांच्या १ मार्च २०२१च्या निर्देशानुसार बीएलओ नियुक्तीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे स्वागत राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे व ऐक्य मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *