इथे भरतोय शिक्षक दरबार, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लगेच निघणार तोडगा..!

| नाशिक | विविध शासकीय विभागांतून शिक्षकांच्या समस्यांना चालना मिळावी तसेच त्यांचे प्रश्‍न समजून घेऊन त्याचा सरकारकडे पाठपुरावा करणे सोपे जावे, यासाठी नाशिकमध्ये मंगळवारी (ता. ९) शिक्षक दरबार होणार आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांना व्यासपीठ देण्यासाठी हा दरबार होणार असून, शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षक दरबाराचा कशासाठी?

आमदार दराडे म्हणाले, की शिक्षकांचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनस्तरावर सुरूच आहे. पण, काही प्रश्‍न असे आहेत की, ज्यांची सोडवणूक विविध अधिकारी व कार्यालयीन पातळीवर होऊ शकते.

याच हेतूने शिक्षकांचा दरबार होत आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याच्या हेतूने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात हजर राहून आपली समस्या लेखी स्वरूपात (पुराव्यासह) मांडावी व सोडवून घ्यावीत, असे आमदार दराडे यांनी सांगितले.

शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन :

मंगळवारी (ता. ९) नाशिक रोड येथील के. जे. मेहता हायस्कूलच्या शोभेंदू सभागृहात दुपारी एकला दरबार होणार आहे. या वेळी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर, वेतनपथक अधीक्षक उदय देवरे, लेखाधिकारी (माध्यमिक) संजय खडसे, सहाय्यक शिक्षण संचालक पुष्पा पाटील उपस्थित राहणार आहेत. शिक्षक दरबारासाठी शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाट, कार्यवाह एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, शिक्षकसेना उत्तर महाराष्ट्रप्रमुख संजय चव्हाण, एम. के. वाघ, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कैलास देवरे, सी. पी. कुशारे, मोहन चकोर, बी. के. सानप, नाशिक जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाट, संजय देवरे, सोमनाथ धात्रक आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *