!…इतके सुंदर सत्याचे दर्शन घडवणारे, माणुसकीचा गहिवर प्रत्येक शब्दात इमानदारीने कोरणारे हे पुस्तक माझ्या आयुष्यातील पाहिले पुस्तक आहे – डॉ. श्रीपाल सबनीस

| पुणे | हजारो पुस्तके वाचली, ५३-५४ पुस्तके, ग्रंथ लिहली तरीही इतके सुंदर सत्याचे दर्शन घडवणारे, माणुसकीचा गहिवर प्रत्येक शब्दात इनामदारीने कोरणारे हे पुस्तक माझ्या आयुष्यातील पाहिले पुस्तक आहे, असे म्हणत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी काल साहित्य नगरीतील पत्रकार भवनात रंगलेल्या दादासाहेब थेटे लिखित ‘ हरवलेली माणसं ‘ या पुस्तकाचे कौतुक केले. अगदी भारावून जात, झपाटून जात हे पुस्तक मी वाचून काढले आणि या माणसाच्या पुस्तकाने मी प्रभावित झालो आहे, असे म्हणत त्यांनी थेट लेख दादासाहेब थेटे यांचा सत्कार केला. हा असा अनोखा प्रसंग देखील यावेळी पाहायला मिळाला. हरवलेली माणसं या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन काल १७ फेब्रुवारी रोजी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना श्रीपाल सबनीस यांनी दादासाहेब थेटे यांच्या पुस्तकातील काळजाला भिडणारा ओघवतेपणा आहे. हा माणूस निव्वळ सामाजिक कार्यकर्ता नाही तर त्यांची लेखणी देखील करुणेने ओलीचिंब भरलेली आहे. हजारो लोकांच्या माणुसकीच्या मापदंडानी पेरलेल्या माणसांचे हे पुस्तक आहे. आजूबाजूच्या खोट्या वातावरणात सत्याची ज्योत घेऊन निघालेला हा माणूस आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून आपल्याला स्पष्ट उलगडता येतो. विषमतेचा, जातीवादाचा अगदी सगळ्या प्रकारचा कोरोना सर्वत्र पसरत असताना माणसांना जागविण्याचा उमेद देणाऱ्या या पुस्तकाला आणि लेखकाला मी वंदन करतो.

या पुस्तकाचे सूक्ष्म परीक्षण श्रीपाल सबनीस यांनी मांडले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या जुन्या काळातील या मित्राच्या पुस्तकाला शुभेच्छा देताना सामाजिक कार्यात सोबत असल्याचे सांगितले.

या पुस्तकाचे लेखक दादासाहेब थेटे यावेळी बोलताना म्हणाले की, हे पुस्तक वाचून तुमच्या डोळयांच्या कडा जर ओलावल्या, समाजातल्या नकारात्मकतेबद्दल मनात चीड निर्माण झाली. समाजातल्या उपेक्षित लोकांकडे तुम्हीही माणूस म्हणून बघायला लागले. आणि या विषम परिस्थितीत समतेसाठी परिवर्तन करण्यासाठी तुम्हीही एक पाऊल टाकण्याची धडपड कराण्याची उमेद तुमच्यात निर्माण झाली. पर्यावरणापासून, शिक्षणापर्यंत कुठल्याही विषयावर आपण अगदी छोटी मोठी जबाबदारी उचलून हे जग सूंदर करण्यासाठी आपण प्रोत्साहित झाले. तर हे पुस्तक लिहण्याचं सार्थक झालं असंच मी समजेल.

अतिशय भावनिक, रंगतदार आणि उपस्थितीना तसेच मान्यवरांना अंतर्मुख, मंत्रमुग्ध करणाऱ्या या पुस्तकाच्या कार्यक्रमाला माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांच्या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. या ललितलेख संग्रहाच्या प्रकाशनापूर्वी महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील अग्रणी असणारे पद्मश्री डॉ प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ रविंद्र कोल्हे, पद्मश्री सिंधुताई सपकाळ, डॉ विकास बाबा आमटे, डॉ गिरीश कुलकर्णी, डॉ प्रल्हाद लुलेकर यासारख्या दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन समाजभान मित्र मंडळ पुणे, मराठीमाती प्रतिष्ठान ठाणे, आम्ही शरदीय ग्रुप पुणे, आनंदवन मित्रमंडळ पुणे यांनी केले होते. या पुस्तक प्रकाशनास संबंध महाराष्ट्रातून श्रोते उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाराज भगत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *