जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विरवाडे-मालापूर रस्त्यावर शेतातून काम आटोपून घरी येत असणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. आरोपी मुकेश पुन्या बारेला (वय २२) यास पोलिसांनी अटक केली आहे. चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतःच्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या. त्यातील १३ वर्षीय मुलीला नराधमाने शेतात ओढून नेत अमानुषपणे अत्याचार करून चेहरा दगडाने ठेचून खून केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला मुळचा रा.बलवाडी ता.वरला जि.बडवानी सध्या रा.पाटचारीजवळ चोपडा यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरापर्यंत एलसीबी पथक, डॉग स्कॉड पथक, फॉरेन्सिक पथक, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी, घटनास्थळी दाखल होऊन तपासचक्रे फिरवत होती. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
काल शनिवारी रोजी सायंकाळच्या ४ ते ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन चार बहिणी स्वतःच्या शेतातून काम करून घराकडे परत येत होत्या. त्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला याने पकडून वाघ्या नाल्याकडे ओढून नेले. अन्य तिघी बहिणी घाबरून गावाकडे धाव घेऊन गावात पोहोचल्या अन् घडलेला प्रकार सांगितला.
घटना ऐकल्यानंतर गावातील ४० ते ५० लोकांचा जमाव जमून शेत परिसरात तिचा शोध घेत असताना सदरील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत विरवाडे शेत शिवारातील भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीचे पीकात आढळून आला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात येऊन धडकताच गावावर शोककळा पसरली. याबाबत पोलिस सुत्रांना माहिती मिळताच फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही तासातच संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक माळेश्वर रेड्डी अप्पर, चाळीसगाव परिमंडळ पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे यांनी भेट दिली. या प्रकरणी हामा सुमला बारेला यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात आरोपी मुकेश पुन्या बारेला याच्याविरुद्ध भाग-५ भारतीय न्याय संहिता कलम ६५, ६६, १०३ पॉस्को ४,८,१२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.कावेरी कमलाकर हे करत आहेत.