| गडचिरोली | सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना दारूचे प्रलोभनात देऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या मुक्तीपथ आणि सर्च संस्थेच्यावतीने ही अनोखी जनजागृती केली जात आहे. त्या अंतर्गत ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, असा सज्जड दम देणारे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे. याकडे सध्या नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
दारु धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणाऱ्या या होर्डिंग्जने जिल्ह्यातील मतदारांनाही विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. या होर्डिंग्जमधून दिला गेलेला संदेश निकोप लोकशाहीच्या सुदृढतेसाठी आहे. या होर्डिंगवर कुणाचेही नाव नाही किंवा कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ज्या दारुचा वापर केला जातो, त्या प्रथेवर हा प्रहार आहे, असेही मत उपक्रम राबवणाऱ्या संस्थांकडून व्यक्त केले जात आहे. हा उपक्रम ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग संचलित ‘मुक्तीपथ’ आणि ‘सर्च’ या संस्थांचा आहे.
डॉ. बंग यांच्या लढ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी झाली. मात्र, आज त्याच जिल्ह्यात अनधिकृत दारु तस्करीने डोके वर काढले आहे. त्यामुळे मुक्तीपथ संस्थेने जनजागृतीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गावागावात जाऊन महिलांना संघटित करुन दारु आणि व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. गडचिरोली, आरमोरी, वडसा, चामोर्शी, कुरखेडा, अशा 5 तालुक्यांमध्ये हे होर्डिंग्ज झळकले आणि एकच चर्चा सुरु झाली. अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनीही या होर्डिंग्जचे कौतुक केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठराव घेतला आहे. त्याचा भाग म्हणून आम्ही यावेळी नेत्यांकडून दारु किंवा पैसे घेणार नाही आणि जो नेता दारु वाटप करेल त्याला मतदान करणार नाही, असे मत झिंगानूर येथील गावकरी सुग्गा आत्राम यांनी व्यक्त केले.