ज्योती भारती यांच्या ‘ बोलावं म्हणतेय ‘ या काव्यसंग्रहास गावगाडा विभागाचा साहित्य पुरस्कार जाहीर..

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | ज्योती हनुमंत भारती यांच्या बोलावं म्हणतेय या काव्यसंग्रहास सोलापूर जिल्ह्यातील वडशिवणे (ता.करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा “रुख्मिणी आप्पासो वाघमारे स्मृती गावगाडा साहित्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. प्रा. ज्योती हनुमंत भारती या सध्या मुंबईतील के. पी.बी. हिंदुजा कनिष्ठ महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात. तसेच अनेक विषयांवरील कथा आणि सामजिक लेख लिहिण्याचे काम त्या सातत्याने करत असतात. दैनिक संचार च्या वृत्तपत्रातून सुरू असणारे त्यांचे “सोशल चौकट” हे सदर लेखनही लोकांच्या विशेष आवडीचे आहे.

कवितेच्या बाबतीत विचार करता कोरोना काळात त्यांनी सुरू केलेली लॉक डाऊन कविता ही त्यांची फेसबुकवरील कवितांच्या व्हिडियोची मालिका विशेष गाजली होती. मागच्या वर्षी त्यांना “न्यायिक लढा पत्रकार संघाचा साहित्यरत्न पुरस्कार” ही प्राप्त झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून फार कमी वेळात ज्योती हनुमंत भारती यांच्या कविता लोकांपर्यंत पोहचल्या हे कौतुकास्पद.

सामजिक विषयावर आधारित तसेच भारतीय लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना सोलापूर जिल्ह्यातील वडशिवणे (ता.करमाळा) येथील विश्वकर्मा तरूण मंडळाच्यावतीने गावगाडा साहित्य पुरस्कार दिला जातो. अत्यंत चुरशीच्या अशा या पुरस्कार प्रक्रियेत शेवटच्या फेरीत पोहचलेल्या साहित्यिक मंडळींच्या मुलाखतीही घ्याव्या लागल्या. यंदा या पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे. त्या निमित्ताने गावगाडा साहित्य पुरस्काराची घोषणा विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी केली आहे. कथा, कादंबरी आणि कविता या तिन्ही साहित्य प्रकारातून हे पुरस्कार दिले जातात.

ज्योती हनुमंत भारती यांच्या बरोबरच पवन नालट (अमरावती) यांनाही काव्य विभागासाठी हा पुरस्कार जाहिर झाला आहे. विश्वकर्मा तरुण मंडळाचे गावगाडा व अन्य साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील इतर साहित्यिकांनाही जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह रोखरक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराने डॉ.सुनिता बोर्डे-खडसे सांगली, श्री हरिशचंद्र दशरथ पाटील टेंभुर्णी, प्रा.संतोष गोणबरे चिपळूण यांनाही कादंबरी व कथेसाठी पुरस्कार मिळाले आहेत.

मा. पार्थ पोळके, सौ.कल्पना दुधाळ, श्री गजानन फुसे, हरिभाऊ हिरडे तसेच डॉ. जनार्धन भोसले, गणेश वाघमारे, कु. प्रज्ञा दिक्षीत, डॉ. संजय चौधरी, हरिश्चंद्र साळुंखे या मान्यवरांनी सदरील साहित्य कलाकृती पुरस्कार निवडीचे काम पाहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.