कर्नाटकातील भाजप सरकार मधील कॅबिनेट मंत्री यांचा सेक्स स्कँडल मधील सहभागामुळे अखेर राजीनामा…!

| बेळगाव | सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकलेले कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालक मंत्री रमेश जारकिहोली यांनी अखेर बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या सेक्स स्कॅण्डलची सीडी समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या सीडीमध्ये जारकिहोली हे एका महिलेसोबत दिसत आहेत. संबंधित क्लीप कर्नाटकच्या वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यामुळे जारकिहोली यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

सेक्स स्कॅण्डल टेपसंबंधी जारकिहोली यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला तसेच विरोधकांकडून टीकेची झोड उठताच जारकिहोली यांना अखेर बुधवारी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

माझ्याविरोधातील आरोप व वस्तुस्थिती यात खूप अंतर आहे. याची निष्पक्षपणे चौकशी झाली आहे. त्याच दृष्टिकोनातून नैतिकेच्या आधारे मी पदाचा राजीनामा देत आहे, असे जारकिहोली यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जारकिहोली यांचा राजीनामा स्वीकारला असून मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. विधानसभेचे गुरुवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. त्याआधी भाजप मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्याने येडियुरप्पा सरकारची चिंता वाढली आहे. काँग्रेस व जेडीएसने जारकिहोली यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. याप्रकरणी काँग्रेसने मंगळवारी बंगळुरूत तीव्र निदर्शने केली होती.

जारकिहोली यांनी कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमधील महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर जारकिहोली यांनी नोकरी देण्याचा शब्द फिरवला होता. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी हा आरोप केला आहे. यासंबंधित सीडी मीडियाला पाठवून खळबळ उडवली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जारकिहोली यांची चौकशी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *