केंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ

| कोल्हापूर | ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भाष्य केले आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असल्याने राज्याचा अधिकार राहिलेला नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे अधिवेशन बोलावण्यापेक्षा लवकरच पंतप्रधानांना मी विनंती करेन की केंद्राचे अधिवेशन बोलवावे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

कोल्‍हापुरात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

सतेज पाटील यांनी म्हटले की, राजर्षी छत्रपती शाहू जयंतीदिनी कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरु होत असून याचा मला आनंद होत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात आहे. केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. राज्य शासनाने जी काही पावले उचलायची आहेत ती उचलली आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. दसरा चौकात पोलिस बँड, शाहिरीतून शाहू महाराजांचे स्मरण करण्यात आले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.