खासदारांची उत्तम खेळी, बेरजेचे गणित सोडवत डोंबिवली मनसेला दिला जोरदार धक्का..!

| कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांनाच आपले करुन एक महत्वाची राजकीय खेळी खेळत मनसेची हवा निवडणूकीपूर्वीच गुल केली आहे. या घटनेमुळे मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मनसेचे कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अजरुन पाटील, दीपक भोसले आदी कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कदम हे पूर्वी शिवसेनेत होते. मनसेची स्थापना झाली त्यादिवपासून ते संस्थापक सदस्य होते. २००९ साली त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. विविध कल्पक आंदोलने करुन महापालिकेतील शिवसेना भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरणारे अशी कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा सच्च कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने मनसेचाच मोहरा हिरावून घेतला आहे. शिवसेनेच्या विरोधात असलेल्या कदम यांना आपले करण्याची किमया शिंदे पिता-पुत्रंनी साधली आाहे. त्यांच्या किमयेमुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

प्रवेशादरम्यान कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारे संयमित नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे आहे. त्याचबरोबर विरोधात असताना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम पाहिले. त्यांनी पत्री पूलाचे काम मार्गी लावत असताना मेहनत घेतली आहे. तसेच खासदार म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. या प्रवेशासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोनच दिवसापूर्वी या सगळ्यांना घेऊन पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त नाही. अचानक त्यांनी आज शिवसेनेत केलेला प्रवेश हा अनाकलनीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *