खासदार डॉ. शिंदे यांनी घेतली MMRDA चे नवनियुक्त आयुक्त SVR श्रीनिवास यांची भेट, कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या व अतिरिक्त टप्प्याबाबत केली निर्णयात्मक चर्चा..!

| कल्याण / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | कल्याण डोंबिलीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर डोंबिवली मोठागाव ते माणकोली खाडीपुलाचे काम पूर्णत्वास येत असताना मोठागांव ते दुर्गाडी या रिंगरोडचे तिसऱ्या टप्प्याचे काम ही एकत्र व्हावे, जेणेकरून होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून कायमस्वरूपी सुटका होईल. या तिसऱ्या टप्प्याच्या निविदे प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले भूसंपादनाची ८० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे एमएमआरडीएने लवकर रिंग रोडच्या मोठागाव ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची निविदा लवकर काढावी अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.

खासदार शिंदे यांनी नुकताच दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानच्या रिंग रोडच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान असे आढळून आले की, रिंग रोडचा सातवा टप्प्या हा टिटवाळा येथे संपतो. मात्र त्यापुढे हा रस्ता गोवेली येथे नेऊन जोडावा लागणार आहे. सदर रस्ता हा कल्याण मुरबाड रोडला जोडला जाईल, एक नवे कनेक्टीविटी तयार होऊन त्यांचा स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना फायदा होईल. त्यामुळे रिंग रोडच्या आठव्या टप्प्यासाठी एमएमआरडीएने तातडीने नियोजन करावे. हा टप्पा केवळ दोन किलोमीटर अंतराचा आहे. दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. दुर्गाडी ते टिटवाळा हा टप्प्या पूर्णत्वास होत असतानाच तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू करून लवकरच तिसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात होईल याकडे एमएमआरडीए प्रशासनाचे खासदारांनी लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *