| कल्याण | कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मोठमोठे पूल बनवले जात आहेत. या सर्व रस्त्यांच्या प्रकल्पांपैकी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे रिंग रोड. या रोडचं काम कितपत पोहोचलं हे पाहण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज थेट बसने प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. श्रीकांत यांचा हा साधेपणा याआधीदेखील अनेकदा दिसला आहे. पत्रीपूलचा गर्डर बसवण्याच्यावेळी तर ते रात्रभर तिथेच थांबले होते. प्रत्येक प्रकल्पच्या पाठपुराव्यासाठी अगदी काम पूर्णत्वास जाईपर्यंत न थकता खासदार डॉ श्रीकांत शिंदे लक्ष देवून असतात. त्यामुळे त्यांनी हातात घेतलेले काम पूर्णच होत असते असा अनुभव मतदारसंघातील नागरिकांना आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर प्रकल्पाच्या कामावर समाधान व्यक्त केलं. या प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. शिंदे यांनी एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बसने दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान प्रवास करीत आतापर्यंत झालेल्या रिंग रोडच्या कामाची पाहणी केली.
या प्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम राजेश मोरे, रवी पाटील आदी उपस्थित होते. पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी रस्ते कामात बाधितांकडून कशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात आहेत. तसेच बाधितांचा कसा त्रास सुरु आहे. तरीदेखाल कामात खंड न पाडता आणि लॉकडाऊनमध्येही काम प्रगतीपथावर ठेवून मार्गी लावत असल्याची माहिती दिली.
‘प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर’
“रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. रिंग रोडचा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठीही भूसंपादनाची प्रक्रिया 80 टक्के झाली आहे. या कामाचीही निविदा लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय दुर्गाडी ते टिटवाळा याठिकाणी रिंग रोडचा एण्ड पॉईंट आहे. या ठिकाणाहून टिटवाळा ते गोवेलीहा हा रस्ता आणखीन जोडण्यासाठी आठवा टप्पाही घेतला जावा, अशी सूचना अधिकारी वर्गास केली”, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.
‘दुर्गाडी ते टिटवाळा फक्त 20 मिनिटाचं अंतर होणार’
“मोठा गाव ठाकूली ते दुर्गाडी आणि दुर्गाडी ते टिटवाळा हा टप्पा आधी पूर्ण करुन मगच काटई ते मोठा गाव ठाकूर्ली दरम्यानचे रिंगरोडचे टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. हा प्रशस्त रिंग रोडचे काम पूर्णत्वास आल्यावर दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कमी होणार आहे. अवघ्या 20 मिनिटात दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कापले जाणार आहे. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे 100 टक्के काम पूर्ण झाल्यावर सर्वार्थाने वाहतूक कोंडी सूटणार आहे”, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.