खूशखबर : १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू..!

| मुंबई | अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेला परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये आणि आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वांना सोयीचं होईल, असं आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

विशिष्ट वेळेतच सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही आणि आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *