| कल्याण | कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या पत्रीपुलाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २५ जानेवारीला हा नवा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑनलाइन सोहळ्याच्या माध्यमातून या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे.
कल्याण पूर्व, डोंबिवलीला जोडण्यासह नवी मुंबईकडे जाण्यासाठी पत्रीपुल हा महत्वाचा धागा आहे. मात्र मुंबईतील रेल्वेपुलाच्या दुर्घटनेनंतर पत्रीपुलासह रेल्वेवरील सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये कल्याणचा ऐतिहासिक पत्रीपुल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे २०१८ मध्ये वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा हा उड्डाणपूल ऑगस्ट २०१८ मध्ये बंद करण्यात आला. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये जुना पत्रीपुल जमीनदोस्त करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक शासकीय, तांत्रिक अडचणींसह कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचा सामना करत आज अखेर पत्रीपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पत्रीपुलाच्या कामासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवातीपासून रेल्वे खात्यासह राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. परिणामी एवढ्या सर्व अडचणी येऊनही हा पूल पूर्ण होऊन आता लोकांच्या सेवेत रुजू होतोय.
या बहुप्रतिक्षित पुलाचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण होणार असून पुढील कैक वर्षे लोकांच्या सेवेमध्ये उभा राहील असा ठाम विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान पत्रीपुल सुरु व्हावा म्हणून कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक जण अक्षरशः चातकासारखी वाट पाहात होता. त्यामुळे येत्या काही दिवसांपासून हा पूल सुरू झाल्यास कल्याण डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.