काही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला. नुकताच काही दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील यादववाडी शाळेला भेट देण्याचा योग आला. रवींद्र केदार सर यांना अगदी सुरुवातीपासून ओळखत असल्याने मित्रत्वाचे नाते असल्याने सदिच्छा भेट घ्यायची होती. पण एरवी ही भेट तीन मिनिटांची झाली असती, पण शाळेत गेल्यावर त्यांचं काम समजून घेताना तीन तास ही कमी पडलेत. असं काय काम चालू आहे..?
रोजच्या जगण्याच्या संघर्षातून रोज नवीन क्रांतीची यादवी मनामनात निर्माण होत असते. प्रत्येकाला वाटत असतं की प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी आणि आदर्श जीवन प्रणाली अस्तित्वात यावी. विचार चांगला आहे, पण त्यासाठी काम करणं मात्र कठीण, पण अशक्य मात्र मुळीच नाही. क्रांतीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल हे आत्मविश्वासाने आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर जोखलेल असेल तर इतिहास घडायला सुरुवात झाली आहे, असं समजायला हरकत नाही. हेच घडत आहे यादववाडी शाळेमध्ये…
2017 साली शाहुवाडी तालुक्यातून करवीर तालुक्यामध्ये बदलीने आल्यानंतर यादववाडी शाळेत आमूलाग्र बदल होणार आहे, हे सांगूनही कोणाला पटले नसते. समोर असलेल्या अडचणी, संकट यातून स्वतःला सावरून प्राप्त परिस्थितीत ही झोकून देऊन काम करण्याचा केदार सरांच्या निश्चयामुळे हे शक्य होत आहे. सकारात्मक सजग आणि आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी त्याच प्रकारचा जागरूक नागरिक घडावा. यासाठी शाळेच्या चार भिंतीच्या आत ते शिकवलं जाव जे शाळेच्या चार भिंतींच्या बाहेर घडत आहे. शिकवायचे म्हणजे नक्की काय शिकवायचे… ? प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळावेत कि पासिंग मार्क येतील असं शिकवावं… ? पण फक्त मार्क मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण शिकवणे ही शिक्षणच नाही. व्हाईटहेड नावाच्या शिक्षणतज्ञाने ‘शिक्षणातून शहाणपण आलं पाहिजेत’ , असं म्हटलं आहे. त्यामुळे मुलांनी शाळेत यावं, अतिशय रंजक पद्धतीने शिकावं, त्यांचा सर्वांगीण शाश्वत विकास व्हावा, गुणवत्ता संवर्धन व्हावे आणि दर्जेदार जीवन जगण्यासाठी गुणवत्तापूर्ण नागरिक घडावा, असे स्वप्न उराशी बाळगून रवी केदार सरांच्या कल्पकतेतून यादववाडी शाळेचा आराखडा बनायला सुरुवात झाली.
कामाची सुरुवात करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात केदार सरांनी आपल्या विशेष कौशल्यपूर्ण मार्गदर्शनातून RTSE, SMART KEY, BDS, ITSE, KTS, समृद्धी, टॅलेंट प्लस, मंथन या जिल्हा व राज्यस्तरीय परीक्षेमधून अपेक्षित यश संपादन केल्यानंतर अनेकांचा वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पण अचानक आलेल्या कोरोणाच्या संकटामुळे यामध्ये खंड निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण इथेही केदार सरांनी संकटाची आणि आपल्या ध्येयाची गाठ भेट होऊच द्यायची नाही, असा निश्चय करून संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे ठरविले. या प्रतिकूल परिस्थितीत देखील “पालकांचे प्रबोधन, गृहभेटी, तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन पालक सभा, ऑनलाईन अभ्यास वर्ग, ऑनलाइन विकली टेस्ट, कोण बनेगा वोकॅब मास्टर, संडे इज फंडे, ऑनलाईन निकाल, ग्रेट भेट लेट्स स्पीक, चला जाणून घेऊया, स्वाध्याय पुस्तिका वाटप अशा नवनवीन कलपक्तापूर्वक उपक्रमांची रेलचेलच पालक आणि अधिकारी वर्गाला बघायला मिळाली. यातून ‘मी थांबणार नाही’ हा केदार सरांनी मनाशी केलेला निश्चय दिसून येत होता. सातत्यपूर्ण चाललेल्या या उपक्रमामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेबांनी देखील ‘ ग्रेट भेट’ या उपक्रमामध्ये सहभागी होऊन या उपक्रमाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना चे संकट कमी होत असताना मुले शाळेत येणार, असे चित्र दिसू लागले. मुलांच्या स्वागताला एकविसाव्या शतकातील वर्ग खोली कशी असावी… ? याचा विचार केदार सरांना सतावू लागला आणि त्यातूनच “स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम” या संकल्पनेचा उगम झाला. पालक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारीवर्ग या सर्वांच्या सहभागातून ३ महिने १७ दिवस एवढ्या कालावधीत शैक्षणिक उठावातून तब्बल अडीच लाख खर्च करून “स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम” अस्तित्वात आली. काय आहे या क्लासरूम मध्ये…. ? जगभरातील विविध लोकांची संभाषण साधता यावी म्हणून इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर व संगणक, सभाधीटपणा व वक्तृत्व विकसित होण्यासाठी कराओके सिस्टिम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हायलाइट करण्यासाठी पिन व शोकेस बोर्ड, आनंदायी बोलक्या भिंती, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वयोमानानुसार संपन्न- परिपूर्ण ग्रंथालय, कलादालन, बागेचा आनंद मिळावा म्हणून ग्राउंड ग्राऊंड ग्रीन मॅट, एलईडी ट्यूब लाईट, इन्वर्टर…… असं बरंच काही…. आणि बरच काही बाकी आहे. एकच नाही इतर वर्गखोल्या आणि संपूर्ण शाळेचा पूर्ण बारीक-सारीक आराखडा आज तयार आहे.
प्रत्येकाला क्रांति हवी आहे असं आपण सुरुवातीलाच म्हणत होतो. राजकीय क्रांती व्हावी, सामाजिक क्रांती व्हावी, सांस्कृतिक क्रांती व्हावी, वैचारिक क्रांती व्हावी यासाठी आजपर्यंत अनेक भलीमोठी महायुद्ध होताना सर्वांनी पाहिले आहेत. या क्रांतीने अनेक आपल्याच अर्भकांचा बळी घेताना आपण पाहिला आहे. पण ज्या उद्देशासाठी हे सगळं झालं, ते सगळं रक्ताचा एक थेंबही न गमावता घडवता आलं असतं. हो ….. आणि हे शक्य आहे. त्यासाठी “शैक्षणिक क्रांती” होणे ही काळाची गरज असते. सुजलाम सुफलाम समाज घडविण्यासाठी वैचारिक प्रबोधन झालेला बहुआयामी नागरिक होणे आवश्यक आहे. याची सुरुवात अशाच चार भिंतीच्या आत शाळेतील अशा कल्पकतापूर्ण कार्यातून होत असते.
केदार सरांशी बोलताना एक गोष्ट विशेष ध्यानात आली, घटक शिकवत असताना आपण घटकाची उद्दिष्टे पाहत असतो. पण ज्यावेळी आपण युनेस्को ची उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून कामाला सुरुवात करतो, त्या वेळी प्रत्येक क्षणाला नवनवीन कल्पना सुचत जातात. आणि शाश्वत शैक्षणिक विकास घडविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करायच्या दिशा मिळत राहतात. अजून एक कठीणातील कठीण गोष्ट त्यांनी करून दाखवली ती म्हणजे.. पालकांचा दृष्टिकोन बदलून दाखविला. परीक्षेतील मिळालेल्या अंकात्मक गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा “सर्वांगीण विकास” जास्त महत्त्वाचा आहे. हे आजकाल सांगून देखील सुशिक्षित पालकांना समजत नाही. पण येथील पालकांना याचं महत्त्व समजतंय, याचं श्रेय केदार सरांना आहे. साडेतीन तासाच्या भेटीमध्ये माजी सभापती व विद्यमान सदस्य पंचायत समिती करवीर सुनिल पोवार, सरपंच मालुताई काळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देशमुख, मनीषा गाताडे, वैशाली कांबळे, दत्तात्रय तोरसकर, जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले तसेच श्रीधर कदम व वर्ग प्रतिनिधी अमित पाटील या सर्वांना भेटण्याचा योग आला. हे सर्वजण या मोठ्या उद्देशाचे ऊर्जास्त्रोत म्हणून काम करत आहेत. सरांना जे सांगायचे आहे ते ही सर्व मंडळी अचूक शब्दात स्पष्टीकरण देत आहेत, ही मानसिकता तयार होणे हे पण एक आगळेवेगळे यश आहे.
यादववाडी गावचा परिसर आसपासच्या वसाहतींनी मिळून बनलेला आहे. आज उच्चभ्रू कुटुंबातील विद्यार्थी ते झोपडपट्टीत राहणारे विद्यार्थी देखील एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. स्वप्नवत वाटणारी ही “कॉमन स्कूल” ची संकल्पना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रत्यक्षात उतरते आहे, हे पाहून बरं वाटत आहे. आज एबीपी माझा सारख्या टेलिव्हिजन न्यूज चॅनेल ने घेतलेली दखल, विविध वृत्तपत्रांमधून छापून येत असलेल्या बातम्या, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी दिलेल्या भेटी, दूर दूर वरून शाळा बघायचे आहे म्हणून येत असलेले शिक्षक, पालक यातून जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा वाढत आहे. अत्यंत सकारात्मक बाजू समाजापुढे जात आहे.
साडे तीन तासाच्या या भेटीनंतर बाहेर पडत असताना अभिनेते स्टीफन फ्राय यांचे उणे पुरे एक वर्षापूर्वीचे शब्द आठवत होते. “And the winner… Global teacher prize 2020… Is Ranjit Disale from India.”
युनेस्को आणि लंडन येथील वारके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील रणजीतसिंह डिसले या जिल्हा परिषदेच्या सामान्य कुटुंबातील मराठमोळ्या प्राथमिक शिक्षकाच्या नावाची घोषणा झाली. आणि क्रिकेट बॉलीवूड आणि राजकारणाच्या गर्तेत अडकलेल्या आपल्या देशवासीयांना याही क्षेत्रात glamour येऊ शकते, याची जाणीव झाली.
या अशा क्षणाला अविष्कार फाउंडेशनचा पुरस्कार आमच्या मित्राला मिळतो आहे…. रवींद्र केदार सर आपल्याला “गल्ली ते ग्लोबल” प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा !!
– मंगेश धनवडे (९४२०३७६७९५)
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कोल्हापूर
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .