कुणी कितीही करुद्या कल्ला, पाठीशी अख्खा जिल्हा, भावना गवळींच्या समर्थनात वाशीममध्ये पोस्टर…

आशिष कुडके :- वाशीम : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची उद्या ४ एप्रिल शेवटची तारीख असतानाही यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.

भावना गवळी यांना उमेदवारी दिली नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, भाजपचा विरोध असल्याने भावना गवळी यांनी दोन दिवस आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर निवस्थानी भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नसल्याने त्यांनी काल पुन्हा मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन मलाच उमेदवारी देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्या सलग पाच वेळा निवडून आलेल्या खासदार आहेत. मात्र, त्यांना मतदारांचा विरोध असल्याचं भाजपच्या सर्व्हेत समोर आल्याने इथला उमेदवार बदला, असं भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. मात्र खासदार भावना गवळी यांनाच महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी भावना गवळी समर्थकांकडून केली जात आहे.

आधीच भाजपचा विरोध असल्याने भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात आली असताना “पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढणार” असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी बोलून दाखवल्याने त्यांची उमेदवारी अजून धोक्यात आली आहे.

नामांकन अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. तरी खासदार भावना गवळी यांची उमेदवारी निश्चित झाली नाही. त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा उमेदवार देण्याचे भाजपने सांगितले. तर मंत्री संजय राठोड सुद्धा आता निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी कोणाला उमेदवारी देणार? भावना गवळी यांची उमेदवारी नाकारली तर कार्यकर्ते राजीनामे देणार का हे उद्यापर्यंत समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *